नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी सोमवारी अपेक्षेप्रमाणे जे.पी. नड्डा यांची वर्णी लागली. यापूर्वी अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. शहा यांच्या काळात भाजपने आक्रमक विस्ताराचे धोरण अवलंबले होते. शहा यांच्या धोरणामुळे भाजपला अनेक राज्यांमध्ये यश मिळाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून भाजप मुख्यालयात अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी केवळ जे.पी.नड्डा यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. सध्या जे पी नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले होते. लोप्रोफाइल असलेले आणि वादग्रस्त ववक्त्यांपासून दूरच राहणारे अतिशय प्रभावी नेते, अशी नड्डांची ओळख आहे. नड्डा यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत असणार आहे. राधामोहन सिंह यांनी नड्डा यांच्या नाव जाहीर केल्यानंतर मावळते भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले.


राज्यसभा सदस्य असलेले जे. पी. नड्डा पक्षाच्या सर्वोच्च संसदीय बोर्डचे सचिवही आहेत. मोदी सरकारच्या गेल्या कार्यकाळात त्यांनी आरोग्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. विद्यार्थी जीवनापासून ते राजकारणात सक्रिय होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघटनेत त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते पहिल्यांदा १९९३ मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभेवर निवडून गेले.