नवी दिल्ली: गेल्या काही तासांपासून मध्य प्रदेशातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सोमवारी रात्री आपल्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. त्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेल काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. तसेच गेल्या काही दिवसांपासून सिंधिया आणि शिवराज चौहान यांच्यात अनेक भेटीगाठी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. 


काँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?


काँग्रेसच्या सध्याच्या मंत्रिमंडळात २८ मंत्री होते. त्यापैकी २० जणांनी काल राजीनामे दिले. तर उर्वरित आठ मंत्री हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक मानले जातात. तसेच सिंधिया गटाचे १७ आमदार बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता सिंधिया या आमदारांना घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



दरम्यान, शिवराजसिंह चौहान यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. भाजपला मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) सरकार पाडण्यात रस नाही. तो काँग्रेसचा अंतर्गत संघर्षातील पेचप्रसंग आहे. काँग्रेस (Congress) नेत्यांमधील संघर्षात काँग्रेसचे सरकार स्वत:च पडेल, असे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.