कलबुर्गी, कर्नाटक : अंधश्रद्धा समाजात किती प्रमाणात भिनलीय, हे पुन्हा एकदा एका ढळढळीत उदाहरणासहीत समोर आलंय. सोमवारी अर्थात २६ डिसेंबर रोजी अमावस्या आणि कंकणाकृती सूर्यग्रहण होतं. याच दिवशी, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या काही आई-वडिलांनीच आपल्या चिमुरड्यांना मानेपर्यंत जमिनीत गाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ग्रहणाच्या अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार कर्नाटकमध्ये घडलाय. अपंग मुलांना सूर्यग्रहणाच्या काळात जमिनीत गाडल्यास त्यांचं अपंगत्व दूर होतं, अशी या अंधश्रद्धाळू लोकांची धारणा होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जन्मतः अपंगत्व असलेल्या चिमुरड्यांना बांधून ग्रहणकाळात मानेपर्यंत मातीत गाडण्यात आलं होतं... कलबुर्गी शहराच्या बाहेर ताज सुलतानपूर विभागामध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलंय... ही लहान मुलं आपली सोडवणूक करण्यात अपयशी ठरत होती.. ती रडत होती, ओरडत होती... मात्र, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं... बघेकरीही या खेळाची मजा लुटताना दिसले.  


धक्कादायक म्हणजे, ग्रहण लागल्यापासून ते सुटेपर्यंत, म्हणजे जवळ-जवळ तीन तास या मुलांना अशाच रडत्या-बिलगत्या अवस्थेत मातीत गाडून ठेवण्यात आलं होतं.


अंधश्रद्धेपोटी छोट्याछोट्या मुलांसोबत हा घृणास्पद प्रकार करणाऱ्यांना खरंतर तुरूंगामध्ये डांबलं पाहिजे. असल्या अघोरी प्रथा करायला लावणारी ही अंधश्रद्धेची घाण समूळ नष्ट केली पाहिजे, असं 'झी २४ तास'चं नागरिकांना आवाहन आहे.