Kangana Ranaut: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार कंगना रणौट अडचणीत सापडली आहे. कंगनाच्या निवडीला हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर न्यायालयाने तिला नोटिसदेखील पाठवली आहे. 21 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायाधीश ज्योत्सना दुआ यांनी किन्नोर येथील रहिवाशी  राम नेगी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे आदेश जारी केले आहेत. नेगी यांनी याचिकेत म्हटलं आहे की, सर्व निकषांची पूर्तता करुनही त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळं कंगना रणौट यांची निवडणूक रद्द करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. तसंच, नेगी यांनी रिटर्निंग ऑफिसरवरदेखील ठपका ठेवत त्यांना या प्रकरणात पक्षकार बनवण्याची मागणी केली आहे. 


नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. लायक राम नेगी हे वनविभागाचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली आणि उमेदवारी अर्ज भरताना रिटर्निंग ऑफिसरकडे थकीत नसलेली प्रमाणपत्रेही सादर केले. सर्व दाखले सादर केले असताना निवडणुक अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावल्याचा दावा केला आहे. त्यामुळं ते निवडणूक लढवू शकले वाहीत. 


नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. जर मला निवडणुक लढवण्याची परवानगी मिळाली असती तर माझा विजयच झाला असता. त्याचमुळं त्यांनी मंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करुन पुन्हा निवडणुक घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या याचिकेनंतर न्यायालयाने कंगना रणौट हिला नोटिस जारी केली आहे. तसंच, 21 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. 


कंगना रणौट हिने मंडी लोकसभा मतदारसंघातून ५,३७,०२२ मते मिळवून ७४,७५५ मताधिक्याने विजय मिळवला होता. तिने काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला होता.