नवी दिल्ली : करावल नगरचे आपचे आमदार कपिल मिश्रा यांना दिल्ली विधानसभेमधून अपात्र ठरविण्यात आले. आपचे हे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांना विधानसभा अध्यक्षांनी जोरदार दणका दिला आहे. कपिल मिश्रा यांना अध्यक्षांनी अपात्र घोषित केले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे करावल नगर विधानसभा जागा रिक्त झाली आहे. आप आमदार कपिल मिश्रा यांच्या विरोधात आपचेच आमदार सौरभ भारद्वाज यांनी पक्षांतर केल्याबद्दल कारवाईची मागणी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेच्यावतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'करवाल नगरचे आमदार कपिल मिश्रा यांना घटनेच्या दहाव्या परिच्छेद २ (१) (ए) अंतर्गत अपात्र घोषित केले आहे. मिश्रा हे २७ जानेवारी २०१९ पासून अपात्र राहणार आहेत. आता करवल नगरची जागा रिक्त मानली जाईल.'


कपिल मिश्रा यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.अर्ध्याच सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मला कोणतेही साक्षीदार तसेच योग्य म्हणणे मांडण्याची संधी दिली गेली नाही, असा त्यांनी आरोप केला आहे. 


कपिल मिश्रा म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या अभियानासाठी शंभर वेळा कुर्बानी माझी आमदारकीची खुर्ची सोडेन. ते म्हणाले की, मी लोकसभेत 'मोदींच्या अभियानासाठी सात जागांचा प्रचार केला होता आणि आता मी मोदींसाठी साठ जागांसाठी अभियान राबवणार आहे.


मिश्रा हे आप सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर वारंवार निशाणा साधत आहेत. कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल आणि मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, त्यानंतर आपने त्यांना निलंबित केले आहे.