नवी दिल्ली: भारतीय सैन्याने कारगिल युद्धात गाजवलेल्या पराक्रमाला शुक्रवारी २० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने देशभरात आज ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले होते. मात्र, त्यांच्याच बलिदानामुळे भारतीय लष्कराने टायगर हिल आणि इतर परिसर पाकिस्तानच्या ताब्यातून पुन्हा हिसकावून घेतला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्काराच्या अतुलनीय शौर्यामुळे पाकिस्तानची चांगली नाचक्की झाली होती. यानंतर गेल्या कित्येक वर्षात पाकिस्तानकडून लहानसहान कुरापती सुरु आहेत. मात्र, पाकिस्तानी लष्कर आजपर्यंत भारताला युद्धाच्या मैदानात थेट आव्हान देण्याची हिंमत करू शकलेले नाही. 


या पार्श्वभूमीवर armedforces.eu या संकेतस्थळाने भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी ताकदीचा आढावा घेतला आहे. या संकेतस्थळावर जगातील प्रत्येक देशाच्या लष्कराविषयीची माहिती उपलब्ध आहे. या माहितीच्याआधारे त्यांच्याकडून विविध देशांच्या लष्करी सामर्थ्याची तुलना केली जाते. 


या माहितीचा आधार घ्यायचा झाल्यास सध्याच्या घडीला भारतासमोर पाकिस्तानचा टिकाव लागणे अशक्य आहे. गेल्या २० वर्षांमध्ये चिलखती (आर्टिलरी), रणगाडे, हवाई युद्धसज्जता आणि नौसेना अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भारताची ताकद कमालीची वाढली आहे. 


भारताचा संरक्षण अर्थसंकल्पही पाकिस्तानच्या पाचपट इतका आहे. पाकिस्तान दरवर्षी संरक्षणासाठी ११ अब्ज डॉलर्स खरेदी करते. तर भारताकडून संरक्षणासाठी जवळपास ५६ अब्ज डॉलर्सचा निधी राखून ठेवला जातो.



भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मनुष्यबळाची तुलना करायची झाल्यास पाकिस्तानी लष्करात ६.५ लाख सैनिक आहेत. तर भारतीय लष्करात २१ लाख जवान आहेत. 



रणगाडे, चिलखती दल (आर्टिलरी), अग्निबाण चिलखती दल (रॉकेट आर्टिलरी) या सर्वच आघाड्यांवर भारताची क्षमता पाकिस्तानच्या दुप्पट आहे.