कारवार : कर्नाटकमधील कारवारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रियकराने भर रस्त्यात प्रेयसीवर चाकूने तब्बल बारा वार केले आहेत. इतकंच नाही तर प्रेयसीवर वार करता करता त्याने स्वतःवरही चाकूचे वार करून घेतलेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम.बी.एमध्ये शिकणाऱ्या दीक्षा आणि सुशांत यांच्यात प्रेमसंबंध होते. पण काही दिवसांमध्ये यांच्यामध्ये वादावादी होऊन ब्रेकअप झालं होतं. त्यामुळे प्रियकर सुशांत हा तिचा सतत पाठलाग करत होता. शुक्रवारी सायंकाळी सुशांतनं भर वस्तीत दीक्षाला गाठून तिच्यावर सपासप चाकूचे वार केले. ज्यावेळी काहीजण दीक्षाला वाचण्यासाठी पुढे सरसावत होते. त्यावेळी सुशांत लोकांना चाकू दाखवून स्वतःवरही वार करून घेत होता. हा सर्व प्रकार दहा ते पंधरा मिनिटे सुरू होता. अखेर घटनास्थळी रुग्णवाहीकेतून आलेल्या नर्सने धाडस करून सुशांतकडे धाव घेतली आणि आपल्या सहकाऱ्यांसह सुशांतच्या हातातील चाकू काढून घेतला.



सुशांतच्या हल्ल्यामध्ये प्रेयसी दीक्षा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कारवारमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीक्षाची प्रकृती चिंताजनक असून सुशांतलाही गंभीर दुखापत झाली आहे. सुशांत दीक्षावर वार करत  असतानाचा सर्व प्रकार काही जणांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला. पण कुणीही दीक्षाला वाचवण्यासाठी पुढे सरसावला नाही. पण एका नर्सने केलेल्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.