सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा घेतली शपथ
Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर डी.के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी सरकारमधील 8 मंत्र्यांनी शपथ घेतली.
Karnataka CM Oath Ceremony : कर्नाटकात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते कर्नाटकचे 30 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. तर डी.के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी सरकारमधील 8 मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला शरद पवार, राहुल गांधी, प्रियंका गांधींसह देशभरातील नेते उपस्थित होते.
देशभरातील हे नेते उपस्थित
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि मंत्र्यांना बंगळुरुच्या कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या शपथविधी समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हे तेच स्टेडियम आहे जिथे सिद्धरामय्या यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी गांधी परिवारातील सदस्य राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
तसेच या शपथविधी सोहळ्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला हे देखील उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण धाडण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे कर्नाटकातल्या शपथविधी सोहळ्याला गेले नाहीत. ठाकरे शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.
या 8 आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
कर्नाटकमधील नवीन सरकारचा शपथविधी आज पार पडला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचवेळी, डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कर्नाटकात आज शपथ घेणाऱ्यांमध्ये 8 मंत्र्यांच्या नावाचाही समावेश आहे. जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खरगे, रामलिंगा रेड्डी, बीझेड जमीर अहमद खान हेही मंत्री झाले. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
मंत्री कोणत्या समाजाचे आहेत?
कर्नाटकमध्ये मंत्री निवडताना प्रत्येक वर्गाची काळजी घेण्यात आली आहे. मंत्र्यांमध्ये असलेले मुनियप्पा हे दलित समाजातील आहेत. जमीर अहमद खान आणि केजे जॉर्ज हे अल्पसंख्याक समाजातील आहेत. तर जारकीहोळी हे अनुसूचित जमातीचे आहेत. याशिवाय रामलिंग हे रेड्डी जातीचे आहेत. दुसरीकडे, सिद्धरामय्या कुरुबा समाजाचे आहेत आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार वोक्कलिगा समुदायाचे आहेत.
सिद्धरामय्या यांच्यासमोर हे आव्हान
उल्लेखनीय म्हणजे, गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सिद्धरामय्या यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर सिद्धरामय्या यांनी राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा मांडला होता. सिद्धरामय्यांसमोरील पहिले आव्हान होते ते योग्य संतुलन राखून मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे. सिद्धरामय्या सरकारमध्ये सध्या आठ जणांचा समावेश करण्यात आला आहे. कालांतराने विस्तार करण्यात येणार आहे.
निवडणुकीत मोठे यश
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला होता. 10 मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 135 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 66 जागा जिंकल्या तर माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दलने (एस) 19 जागा जिंकल्या.