आता, बोपय्यांच्या वादग्रस्त निवडीवरून काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव
काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात.
बंगळुरू : कर्नाटकातील रणसंग्रामात काँग्रेस - भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सुप्रीम कोर्टानं कर्नाटकात बी एस येडियुरप्पा यांना उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. अशा वेळी नव्या विधानसभा संचालनासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजप आमदार के जी बोपय्या यांची निवड केलीय. राज्यपालांनी घाईघाईतच त्यांचा शपथग्रहण सोहळाही उरकून घेतलाय. परंतु, काँग्रेसला मात्र हा निर्णय रुचलेला नाही. काँग्रेसनं या प्रकरणात पुन्हा एका सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात.
बोपय्या यांचा शपथविधी
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कर्नाटकात भाजप आमदार के जी बोपय्या यांच्या नावाची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. उद्या फ्लोअर टेस्टही बोपय्याचं घेणार आहे. यासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी शुक्रवारी बोपय्या यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. बोपय्या गेल्या वेळी भाजप सरकारमध्ये कर्नाटक विधानसभा अध्यक्ष होते. सध्या ते विराजपेठ मतदार संघातून भाजपचे आमदार आहेत. परंतु, के. जी. बोपय्या यांच्या निवडीला काँग्रेसनं जोरदार आक्षेप घेतलाय.
हंगामी अध्यक्ष म्हणजे काय?
हंगामी म्हणजे 'काही काळापुरता'... हंगामी अध्यक्षांची निवड राज्यपाल करतात. जेव्हा विधानसभा आपला अध्यक्ष नियुक्त करू शकत नाही अशा वेळी राज्यपाल हंगामी अध्यक्ष नेमू शकतात. हा अध्यक्ष नवनिर्वाचितांना शपथ देतो... आणि संपूर्ण कार्यक्रम यांच्या देखरेखीतच पार पडतो.