Karnataka Government Formation: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवण्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यासंदर्भातील निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काँग्रेस समोर मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाल्याचं चित्र दिसत असून निकालाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्याची घोषणा होण्याची अपेक्षा असताना तसं काहीही घडलं नाही. दरम्यान निवडून आलेल्या सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये एकमताने मुख्यमंत्री कोण याचा निर्णय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंनी घ्यावा असं निश्चित करण्यात आलं आहे. सध्या कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या (Siddaramaiah) या दोघांच्या नावाची चर्चा असून नेमकं मुख्यमंत्रीपदी कोण बसणार यावरील सस्पेन्स अजूनही कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आज कर्नाटच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतून जाहीर होण्याची शक्यात आहे. आज खरगे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेणार आहेत.  सिद्धरमैय्या आणि शिवकुमारही आज दिल्लीत असतील असं सांगितलं जात आहे. काँग्रेसचे प्रभारीही आज दिल्लीत तळ ठोकून आहेत. जाणून घेऊयात याचसंदर्भातील


10 महत्त्वाचे मुद्दे...


1) डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या हे दोघेही दुपारी साडेतीन ते 4 च्यादरम्यान दिल्लीत पोहणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची शिवकुमार आणि सिद्धरमैय्यांबरोबर बैठक होणार आहे. त्यानंतरच सायंकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल.


2) कर्नाटकमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी रविवारी सायंकाळी बंगळुरुमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पक्षाध्यक्ष खरगे यांना मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. यासंदर्भात प्रस्तावच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीत संमत करण्यात आला.


3) सीएलपीच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे महासचिव (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांनी 3 केंद्रीय पर्यावेक्षकही सहभागी होते. या तिघांनाही शिवकुमार आणि सिद्धरमैय्या यांच्याबरोबर बैठक घेतली. 


4) सर्व नवनिर्वाचित आमदारांनाही या तिन्ही पर्यावेक्षकांना मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार पक्षाध्यक्षांकडे सोपवण्यात यावा असं कळवलं आहे. आजच हे पर्यावेक्षक खरगे यांच्याकडे या बैठकीचा अहवाल सादर करणार आहे. सुशील कुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची पर्यावेक्षक म्हणून पक्षाध्यक्षांनीच निवड केली होती.


5) सिद्धरमैय्या आणि शिवकुमार या दोघांची चर्चा असताना आता निवडीचा चेंडू पक्षाध्यक्षांच्या कोर्टात आहे. आज हे दोन्ही नेते काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खरगेंची भेट घेण्याची शक्यता आहे. 


6) 'जनता परिवार'शी संबंधित आणि कट्टर काँग्रेस विरोधक अशी ओळख असलेल्या सिद्धरमैय्या यांनी 2006 साली पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही पार पडली. सध्या ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत असून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. सिद्धरमैय्या हे कुरुबा समाजातून येतात. हा समाज राज्यातील तिसरा सर्वात मोठा समाज आहे.


7) सिद्धरमैय्या यांनी 2013 ते 2018 दरम्यान राज्याचं मुख्यमंत्रीपद संभाळलं. त्यावेळीही  काँग्रेसचे सध्याचे पक्षाध्यक्ष एम. मलिकार्जून खरगेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होतं मात्र पक्षाने सिद्धरमैय्यांकडे ही जबाबदारी सोपवली.


8) कर्नाटकमधील निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवकुमार यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. वोक्कालिगा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या शिवकुमार यांनी 2003 पासून वेळोवेळी पक्षासाठी संकटमोचक म्हणून काम केलं आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेला वोक्कालिगा समाज हा कर्नाटकमधील लिंगायत समाजानंतरचा दुसरा सर्वात मोठा प्रभावी गट आहे. शिवकुमार हे 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.


9) 15 मे रोजी 1962 साली शिवकुमार यांचा जन्म झाला आहे. डोड्डालहल्लीमध्ये त्यांचा जन्म झाला आहे. त्यांनी 1980 साली विद्यार्थी नेता म्हणून काँग्रेससाठी काम सुरु केलं. त्यानंतर ते मजल दरमजल करत काँग्रेसमध्ये सक्रीय झाले. शिवकुमार यांनी 1989 साली सथानूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली. त्यावेळी शिवकुमार केवळ 27 वर्षांचे होते. 


10) 224 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल 13 तारखेला लागले. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने 1989 नंतर पहिल्यांदाच विक्रमी 135 जागा जिंकल्या भाजपाला केवळ 66 तर माजी मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षाला केवळ 19 जागा मिळाल्या.