भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे - राहुल गांधी
जे काही कर्नाटकमध्ये सुरु आहे. त्यावरुन लोकशाही कुठे शिल्लक राहिली आहे. हा लोकशाहीचा खून आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यानी केलेय.
नवी दिल्ली : जे काही कर्नाटकमध्ये सुरु आहे. त्यावरुन लोकशाही कुठे शिल्लक राहिली आहे. हा लोकशाहीचा खून आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यानी केलेय. काँग्रेस आणि जेडीएस यांच्या आघाडीने बहुमतासह सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र, राज्यपाल यांनी भाजपलाच निमंत्रण दिले. तसेच बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यावरुन राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली.
येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांच्याकडे साधे बहुमत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. बहुमत नसताना सरकार स्थापन करणारा भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला.
सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर आज सकाळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली. बहुमत नसताना भाजप अट्टाहासाने सरकार स्थापन करत आहे. भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे. भाजप आज विजयी जल्लोष करेल, तर दुसरीकडे संपूर्ण देशाला लोकशाहीच्या पराभवाचं दुःख असेल, हा लोकशाहीचा खून आहे, ते म्हणालेत.
कर्नाटकात निवडणूक निकालानंतर ४८ तासांच्या सत्तासंघर्षानंतर कर्नाटकात भाजपने सत्ता स्थापन केलीय. बी एस येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाल यांनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झालेत. आता विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी येडियुरप्पा सरकारला १५ दिवसांची मुदत आहे.