गरोदर महिलांचा प्रवास सुकर होण्यासाठी `या` रिक्षा चालकांची अनोखी सेवा
एका प्रसंगानंतर घेतला हा निर्णय
कर्नाटक : कर्नाटकात फिरण्यासाठी किंवा सहज काही कारणाने जाणं होणार असेल तर या फेरीला मल्लिकार्जुन नावाच्या रिक्षा चालकांना नक्की भेटा. कारण, सध्या सोशल मीडियावरही त्यांची चर्चा होत आहे. मुळात कर्नाटकात मल्लिकार्जुन हे बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत असं म्हणायला हरकत नाहीत. ते प्रसिद्ध आहेत ते म्हणजे त्यांच्या समाजकार्यामुळे. समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी ओळखत त्यांनी कलबुर्गी भागात असणाऱ्या गरोदर महिलांना मोफत प्रवासाची सेवा देण्याची सेवा देण्याचं कार्य हाती घेतलं आहे.
चार रिक्षांच्या सहाय्याने ते हे समाजकार्य करतात. चोवीस तासांसाठी त्यांच्याकडून ही सेवा पुरवण्यात येते. कुटुंबातीलच एका घटनेनंतर त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने त्याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं.
खुद्द मल्लिकार्जुन यांनीच त्या प्रसंगाची माहिची दिली होती. 'पाच वर्षांपूर्वी त्यांची बहीण गरोदर असताना अचानकच रात्रीच्या वेळी तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. ज्यानंतर तिला रुग्णालयात न्यावं लागणार होतं. पण, ते ज्या भागात राहात होते, तेथे कोणतीच रुग्णवाहिका नव्हती. शिवाय रुग्णालयापर्यंत त्यांना नेण्यासाठीही कोणी तयार नव्हतं. त्यावेळी मल्लिकार्जुन यांच्या कुटुंबाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी मल्लिकार्जुन यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो निर्णय होता गरोदर महिलांना रिक्षाने मोफत प्रवास सेवा पुरवण्याचा.
चार रिक्षांचे मालक असणाऱ्या मल्लिकार्जुन यांनी चारही रिक्षांनी ही सेवा पुरवण्याचं काम सुरू ठेवलं असून, त्यांनी गरजूंच्या सोयीसाठी म्हणून रिक्षांवर संपर्क साधण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आणि इतरही आवश्यक माहिती दिली आहे. जेणेकरुन गरज पडल्यास तातडीने संपर्क साधून त्य़ांची मदत घेता येऊ शकते.