करतारपूर कॉरिडोर उद्घाटनाप्रसंगी मनमोहन सिंह आणि `सरदार` मोदी यांची भेट
शनिवारी कॉरिडोरच्या उद्घाटनानंतर ५०० भारतीय श्रद्धांळूंचा एक गट करतारपूर कॉरिडॉरद्वारे पाकिस्तानात दाखल झाला
अमृतसर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनासाठी पंजाबला दाखल झाले तेव्हा त्यांनी शीख पगडी परिधान केली होती. संपूर्ण वेळ त्यांनी डोक्यावर भगव्या रंगाची पगडी परिधान केली होती. या दरम्यान त्यांची भेट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत झाली. या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी यांनी एकमेकांची आत्मियतेने भेट घेतली.
शनिवारी कॉरिडोरच्या उद्घाटनानंतर ५०० भारतीय श्रद्धांळूंचा एक गट करतारपूर कॉरिडॉरद्वारे पाकिस्तानात दाखल झाला. याच भारतीयांच्या गटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, सुखबीर सिंह बादल, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल तसंच नवज्योत सिंह सिद्धू यांचाही समावेश होता.
पाकिस्तानमध्ये स्थित गुरुद्वारा दरबार साहेब आणि पंजाब जिल्हा स्थित डेरा बाबा नानक यांना हा कॉरिडोर जोडतो. शीख धर्मगुरु गुरु नानक देव यांनी आपल्या आयुष्यातील काही शेवटची वर्ष याच गुरुद्वारा दरबार साहेबमध्ये व्यतीत केले होते.
मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी दोघांच्याही चेहऱ्यावर एक समाधानकारक हास्य होतं.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी भारताच्या भावनांचा आदर करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानले.