Kedarnath Dham : तंत्रज्ञानामुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं. इतकं की, आपल्यापासून मैलो दूर असणाऱ्या पर्वतरांगांच्या कुशीत दडलेल्या एखाद्या ठिकाणालाही तुम्ही बसल्या जागेवरून पाहू शकता. त्यात सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं या अशा ठिकाणांची बहुविध रुपंही आपल्याला पाहायला मिळतात. एका ठराविक प्रमाणात हे सारंकाही सुरेख वाटतं. पण, त्यानंतर मात्र मर्यादांचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात येतं आणि मनात अनेक प्रश्न उभे राहतात. सध्या (Chardham Yatra) चारधाम यात्रेतील एक श्रद्धास्थळ असणाऱ्या केदारनाथ मंदिर परिसराबाबत असंच मत तयार होताना दिसत आहे. 


एका रीलमुळं तणावाचं वातावरण... (Viral Reel)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केदारनाथाच्या दर्शनाला गेलं असता तो आनंद व्यक्त करण्यासाठी अनेकजण सध्या फोटो आणि रील्स सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यातच एक व्हिडीओ समोर आला जिथं एका तरुणीनं तरुणाचा अंगठी देत प्रपोज केल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओला व्ह्यूज मिळाले, तो ट्रेंडमध्येही आला. पण, त्यामुळं एका वादानं डोकं वर काढलं. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनीच मंदिर परिसरामधील मोबाईल वापराबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आणि केदारनाथ- बद्रिनाथ मंदिराच्या वतीनं हा मुद्दा गांभीर्यानं विचारात घेण्यात आला. ज्यामुळं येत्या काळात मंदिर परिसरामध्ये मोबाईलवर बंदीही आणली जाऊ शकते. 


हेसुद्धा वाचा : Badrinath Temple : बद्रिनाथ मंदिरात शंखनाद का करत नाहीत? रहस्यमयी कारण समोर 



धार्मिक भावना दुखावल्या... 


प्रपोज करतानाच्या व्हिडीओला अनुसरून आता प्रशासन अशा घटकांवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. ही बाब अधोरेखित करत मंदिर प्रशासनानं पोलीस यंत्रणांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात धार्मिक भावना दुखावल्याची बाब प्रकाशात आणली गेली आहे. ज्यामुळं आता केदारनाथ मंदिर आणि नजीकच्या परिसरातील सर्व व्हिडीओ, You Tube Shorts, Reels वर प्रशासनाचीच करडी नजर असणार असून गरज प़डल्यास हे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईसुद्धा होऊ शकते. 



प्राथमिक माहितीनुसार सध्याच्या घडीला केदारनाथ मंदिर परिसरात भाविकांना मोबाईल Switch Off ठेवूनच प्रवेश करण्याची विनंती करण्यात आली आहे. किंबहुना मंदिर परिसरात भाविक मोबाईल आणू नयेत यासाठी ते सुरक्षित स्थळी ठेवण्याचा पर्यायही प्रशासन शोधत असून, प्रायोगित तत्वावर तो वापरात आणला जात आहे. 


महत्त्वाचा मुद्दा असा, की अनेकजण या श्रद्धास्थळांवर अनेकजण मोठ्या भक्तिभावानं येतात, अनेकजण खडतर प्रवास करून येतात. अनेकांसाठी इथवर येणं म्हणजे आयुष्यभराचं सार असतं. पण, याच पवित्र ठिकाणांनाही Trending Topic मध्ये आणत व्ह्यूज, लाईक्सचं गणित इथं लागू करणं कितपत योग्य?