मुंबई: केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी आयएमडीकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. 'एएनआय'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्यांनी ही माहिती देत काही महत्त्वाच्या गोष्टीही स्पष्ट केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयएमडीकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक असणाऱ्या अरबी समुद्रातील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. ज्यामुळे येत्या काळात वादळसदृश्य परिस्थिती उदभवण्याची चिन्ह असल्याचंही कळत आहे. त्यामुळेच हा इशारा देण्यात आला आहे. 



समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारांनी ५ ऑक्टोबरपर्यंत किनाऱ्यावर यावे असा इशाराही त्यांना देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला येणाऱ्या दिवसांसोबतच ७ ऑक्टोबर या दिवसासाठी रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. 


दरम्यान, कोणतीही संकटाची परिस्थिती उदभवली तर मदत म्हणऊन यंत्रणा सज्ज असल्याचं कळत असून एनडीआरएफच्या तुकड्यांचीही मदत घेणार असल्याचं विजयन यांनी स्पष्ट केलं. 



काही दिवसांपूर्वीच आलेल्या पुरातून केरळ राज्य कुठे सावरत नाही तोच आता या नव्या संकटाचं सावट राज्यावर पाहायला मिळत आहे. 



आयएमडीकडून मिळालेल्या माहितीनंतर केरळमध्ये आलेल्या पर्यटकांनाही डोंगराळ भागांमध्ये न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


केरळमधील मुन्नार भागातील टेकड्यांवर सध्या नीलाकुरुंजी फुलांना बहर आला आहे, जो पाहण्यासाठी बऱ्याच पर्यटकांचे पाय देवभूमी केरळकडे वळले होते. पण, आता वातावरणातील बदल पाहता पर्यटकांनीही काही गोष्टींची काळजी घ्यावी असा इशारा केरळ राज्यशासनातर्फे देण्यात आला आहे.