Crime News : गेल्या काही दिवसांपासून देशात बुरखा (burqa) घालून काही ठिकाणी प्रवेश देण्यावरुन जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये हा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये बुरखा बंदीची मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अशातच केरळमध्ये बुरख्यावरुन एक वेगळा वादंग उठल्याचे पाहायला मिळालं आहे. केरळच्या एका मॉलमध्ये (Kochi mall) एक इंजिनिअर तरुण बुरखा घालून थेट महिलांच्या स्वच्छतागृहात शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र त्याला पकडल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळच्या लुलू मॉलमध्ये 23 वर्षीय अभिमन्यू नावाचा तरुण बुरखा घालून थेट महिलांच्या टॉयलेटमध्ये घुसला होता. त्यानंतर या तरुणाने फोनवर व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर त्याच्यावर पडताच एकच गोंधळ उडाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ मॉलमध्ये पोहोचत तरुणाला ताब्यात घेत अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उच्चशिक्षण घेत आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 क, 419 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66इ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटकेनंतर आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही बातमी कळताच मॉलमध्ये आलेल्या महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं होतं. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.


पोलिसांनी सांगितले की, आरोपी इन्फोपार्क येथील एका आयटी कंपनीत काम करतो. महिलांचे व्हिडीओ काढेेण्यासाठी त्याने खूप आधीपासून नियोजन केले होते. त्यासाठी त्याने दुकानातून बुरखा देखील विकत घेतला होता. ठरल्यानुसार तो बुरखा घालून लुलू मॉलमध्ये गेला आणि लेडीज वॉशरूममध्ये शिरला. त्याने आपला मोबाईल वॉशरूममध्ये ठेवला होता. यासाठी त्याने आपला फोन एका छोट्या कार्डबोर्ड बॉक्समध्ये ठेवला आणि त्याला छिद्र पाडले. तो बॉक्स त्याने वॉशरूमच्या दारावर चिपकवला होता.



मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना तरुणाची हालचाल संशयास्पद वाटू लागली. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून चौकशी केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून बुरखा आणि मोबाईल फोनही जप्त केला आहे. आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारची कृत्ये केली होती का, याचा शोध पोलीस घेत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.