केरळात जलप्रलय : १६४ जणांचे बळी, आयएएस अधिकाऱ्यांची अशी माणूसकी!
केरळात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालेय. आतापर्यंत १६४ जणांचे बळी गेलेत.
तिरुवनंतपुरम : केरळमधील जोरदार पावसामुळे पुराचा वेढा बसलाय. गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालेय. आतापर्यंत १६४ जणांचे बळी गेलेत. हेलीकॉप्टर, सुरक्षा दलाचे कर्मचारी, लष्कराची मदत घेण्यात आलेय. मात्र, पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. पेरियार आणि अन्य नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी गावांत आणि शहरात घुसलेय. त्यामुळे अनेक जण बेघर झालेत. दरम्यान, आयएएस अधिकाऱ्यांनीही मदतसाठी स्वत:ला झोकून दिलेय. लहान मुलांना उचलून तसेच खांद्यावर अन्न-धान्याच्या गोणीही वाहून नेत एक वेगळा आदर्श घालून दिलाय.
केरळमध्ये पावसामुळे महापूरसदृश स्थिती झालेय. या पुराने आणखी ३० जणांचे बळी घेतले असून मृतांची एकूण संख्या आता १६४ वर पोहोचली आहे. या पावसामुळे घरे वाहून गेली असून रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवाई आणि रेल्वे वाहतुकीवरही त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. पावसाच्या हाहाकारामुळे आत्तापर्यंत तब्बल आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
त्रिचूर, अलुवा आणि मुवात्तूपुझा येथे अडकलेल्या रहिवाशांना भारतीय नौदलाकडून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. पुराने वेढलेल्या घराच्या छप्परांवर रहिवासी अडकले असल्याचे व्हिडीओ दिवसभर व्हायरल होत होते. राज्यातल्या १४ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कोचीपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरांमध्येही दोन मजली इमारतींएवढं पाणी साचले आहे. त्यामुळे पुराची तीव्रता लक्षात येत आहे. पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
मदत छावण्यांमध्ये आतापर्यंत दीड लाख विस्थापित आणि बेघरांनी आश्रय घेतलाय. राज्यात सगळ्यात जास्त फटका अर्नाकुलमजवळच्या पेरियार नदीलगतच्या गावांना बसलाय. इडुकी या भागाचा तर संपर्क संपूर्णपणे अन्य भूभागापासून तुटला आहे. ८ ऑगस्टपासून गेले आठ दिवस पावसाने आणि पुराने केरळच्या बहुतांश भागाला झोडपले असून कासारगोड वगळता सगळ्या जिल्ह्यांमध्ये रेड अॅलर्ट आहे. लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या ५२ तुकड्या मदत कार्यात झोकून काम करीत आहेत.