तिरुवअनंतपूरम : देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्नशील असताना दिसत आहे. त्यातच हँड सॅनिटायजर्स आणि तोंडावर लावण्यात येणारे मास्क यांची मागणी वाढलेली आहे. काही ठिकाणी तर या गोष्टींचा तुटवडाही जाणवू लागला आहे. यावरच तोडगा म्हणून आता राज्य सरकारने एक अनोखी शक्कल लढवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाशी सुरु असणाऱ्या या संघर्षामध्ये थेट कारागृहातील कैद्यांचीही मदत घेण्यात येत आहे. केरळ सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. सोबतच त्यांनी काही फोटोही जोडले. ज्यामध्ये कैद्यांनी तयार केलेले मास्क पाहायला मिळत आहेत. 


'तुटवडा जाणवू लागल्यानंतर लगेचच कारागृहातील कैद्यांना राज्य सरकारकडून मास्क तयार करण्यास सांगण्यात आलं. .युद्धपातळीवर हे काम करण्यात आलं', असं लिहित त्यांनी तिरुवअनंतपूरम येथील कारागृह अधिकाऱ्यांनी या मास्कची पहिली तुकडी हस्तांतरित केल्याची माहिती त्यांनी दिली. 




विजयन यांनी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवल्यानंतर केरळ राज्यशासनाच्या या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आलं. कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली असतानाच या वातावरणामध्ये अनेकांनीच या निर्णयाबद्दल राज्य शासनाची दाद देत अशा प्रकारची पावलं उचलली गेली पाहिजेत असा आग्रही सूरही आळवला. थोडक्यात प्रत्येकाच्याच प्रयत्नांची परिसीमा पाहिल्यानंतर आता या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल हा एकमेव हेतू साऱ्या देशापुढे आणि साऱ्या विश्वापुढे उभा आहे हेच खरं.