कोझीकोड : केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२३ जण जखमी झाले आहेत, या जखमींपैकी १२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. विमान अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईवरून भारतात आलेल्या एयर इंडियाचं A737 बोईंग या विमानाचा कोझीकोडच्या करीपूर विमानतळावर लॅण्डिंगवेळी अपघात झाला. नागरी उड्डाणमंत्री हरदीपसिंग पूरी यांनी हा अपघात कसा झाला याची प्राथमिक माहिती दिली आहे. 



दुबईवरून भारतात आलेल्या एयर इंडिया एक्सप्रेसच्या AXB-1344 विमानाचा कोझीकोडमध्ये अपघात झाला. पावसाळी वातावरणात विमान धावपट्टी ओलांडली आमि विमान उतारावर ३५ फूट खाली गेलं. यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले, असं ट्विट हरदीपसिंग पूरी यांनी केलं आहे. पूर्ण वेगानेे हे विमान लॅण्ड होत होतं. या अपघाताच्या पुढच्या चौकशीचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. 



दुबईवरून भारतात येणाऱ्या एयर इंडियाच्या या विमानामध्ये १७४ प्रवासी, १० लहान मुलं, २ पायलट आणि ५ केबिन क्रू, असे एकूण १९१ जण होते. या विमान अपघातात मृत्यू झालेले पायलट कॅप्टन दीपक साठे हे भारतीय वायूदलात विंग कमांडर होते. कॅप्टन दीपक साठे यांनी १९८१ ते २००३ या कालावधीमध्ये देशसेवा केली. वायूदलातून निवृत्त झाल्यानंतर दीपक साठे २००३ साली एयर इंडियामध्ये रुजू झाले. दीपक साठे हे मुंबईच्या पवईतील जलवायू विहार येथे राहत होते.


कोझीकोड विमान अपघातात मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा मृत्यू