अनोखी कहाणी! लग्नाच्या १० महिन्यातच वेगळे झाले, ७२ वर्षांनी भेटताच डोळ्यात अश्रु दाटले
नशिबाने घात केला, लग्नाच्या १० महिन्यात वेगळे झाले आणि ७२ वर्षांनी नशिबाने पुन्हा भेटले
केरळ : लग्न म्हणजे दोन जीवांचा संसार. लग्न म्हणजे अतुट बंधन. पण कधी कधी काही कारणास्तव लग्नात वितृष्ट येतं आणि दोघांना विभक्त व्हावं लागतं. पण त्यांच्या मनांच नातं मात्र कधीच संपत नाही. याची साक्ष म्हणजे केरळमधलं ईके नारायण नांबियार आणि त्यांची पत्नी शारदा यांची अनोखी कहाणी.
लग्नाच्या दहा महिन्यातच वेगळे
लग्नाच्या दहा महिन्यात वेगळं व्हावं लागलेलं हे विवाहित जोडपं तब्बल ७२ वर्षांनी पुन्हा भेटलं. 93 वर्षीय ईके नारायणन नांबियार यांना 1946 मध्ये त्यांची पत्नी शारदा (आता 89 वर्षांची) यांच्यापासून वेगळं व्हावं लागलं. कारण त्यावेळी नारायणन यांना केरळमधील कवुंबई गावातील शेतकरी आंदोलनात तुरुंगवास भोगावा लागला होता.
तब्बल ७२ वर्षांनी पुन्हा भेट
लग्नाच्या वेळी शारदा फक्त 13 वर्षांच्या होत्या तर नारायणन यांचं वय होतं फक्त १७ वर्ष. 72 वर्षांनंतर, केरळमधील पारसिनिकडावू इथं शारदा यांचा मुलगा भार्गवन याच्या घरी शारदा नारायणन यांना भेटल्या. या भेटीत दोघांचेही डोळे भरून आले. बोलण्यासारखं खुप होतं, पण दोघांच्याही तोंडून शब्द फुटत नव्हते.
नारायणन आपल्या पहिल्या पत्नी शारदा यांच्या शेजारी शांतपणे बसले होते. शारदा तिचे अश्रू पुसत म्हणाली, 'मला कोणावरही राग नाही. मी कोणावर रागावलेली नाही. यानंतर दोघांनाही अश्रु अनावर झाले.
स्वातंत्र्य लढ्यातील कहाणी
शारदा आणि नारायण यांचं लग्न झालं त्यावेळी स्वातंत्र्यलढा शिगेला पोहचला होता. शारदाशी लग्न केल्यानंतर अवघ्या दहा महिन्यातच नारायणन यांना भूमिगत व्हावं लागलं होतं. नारायणन यांचे वडिले थालियन रमण नांबियार यांनी कवुंबई गावात एका आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं, आणि त्यामुळे ब्रिटीश पोलिस त्यांच्या शोधात होते.
दोन महिन्यांनी ब्रिटीश पोलिसांनी या नारायणन आणि त्यांच्या वडिलांना शोधून काढलं आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. तर शारदा यांना आपल्या वडिलांच्या घरी पाठवून देण्यात आलं.
नांबियार यांच्या घराला आग लावण्यात आली आणि ते घर बेचिराख झालं. नारायणन यांना आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. यादरम्यान ११ फेब्रुवारी १०५० रोजी नारायणन यांचे वडिल थालियान रमन यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.
तिकडे शारदाच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसरीकडे करण्याचा निर्णय घेतला. १९५७ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर नारायणन यांनीही दुसरं लग्न केलं.
अशी झाली शारदा आणि नारायणन यांची भेट
या घटनेच्या अनेक वर्षांनंतर शारदा यांचा मुलगा भार्गवन आणि नारायणन यांचे नातेवाईक एका कार्यक्रमात भेटले. त्यांच्या बोलण्यातुन एकमेकांच्या कुटुंबाचा इतिहास कळला. आणि त्याचवेळी शारदा आणि नारायणन यांची भेट घडवून आणण्याचा निश्चय करण्यात आला. ठरल्यानुसार नारायणन काही नातेवाईकांसह शारदाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले.
शारदा यांच्या पतीचं तीस वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांना सहा मुलं आहेत, त्यातील चार जिवंत आहेत. भार्गवन यांनी सांगितलं की, सुरुवातीला त्यांची आई शारदा यांनी भेटण्यास नकार दिला. पण खूप आग्रहानंतर अखेर त्या नारायणन यांना भेटायला तयार झाल्या.
भार्गवनने यांनी सांगितलं की, भेटीच्या वेळी दोघंही खूप भावूक झाले होते. यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी भविष्यात एकमेकांशी संपर्क ठेवण्याचं आश्वासन दिले. नारायणन यांची नात शांता कवुंबई हिने कवुंबईच्या संघर्षावर '३० डिसेंबर' ही कादंबरी लिहिली आहे.