केरळमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींना नकाब घालण्यास मनाई
आधुनिकता किंवा धार्मिक परंपरेच्या नावाखाली एखाद्या विशिष्ट पेहराव पद्धतीचा पुरस्कार करणे चुकीचे ठरेल.
तिरुवनंतपुरम: सध्या देशभरात बुरखा परिधान करण्याच्या मुद्द्यावरून वादविवाद सुरु असतानाच केरळमधील एका मुस्लिम शिक्षणसंस्थेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संस्थेने विद्यार्थिनींना नकाब परिधान न करण्याचा आदेश दिला आहे. मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी या शिक्षणसंस्थेची केरळमध्ये अनेक महाविद्यालये आहेत. यामध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचाही समावेश आहे. या संस्थेने पुरोगामीपणा दाखवत विद्यार्थिनींना नकाब न घालण्याचे आदेश दिले आहेत. याविषयी स्पष्टीकरण देताना संस्थेने म्हटले आहे की, आधुनिकता किंवा धार्मिक परंपरेच्या नावाखाली एखाद्या विशिष्ट पेहराव पद्धतीचा पुरस्कार करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि अवांतर गोष्टींशिवाय पेहरावाचेही भान ठेवावे. त्यामुळे आपण संस्थेच्या परिसरात अयोग्य गोष्टी होण्यापासून थांबवल्या पाहिजेत, असे मुस्लिम एज्युकेशनल सोसायटीकडून सांगण्यात आले.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्यामुळे संस्थेच्या अखत्यारितील महाविद्यालयांनी विद्यार्थिनी वर्गांमध्ये नकाब घालून येणार नाहीत, याबद्दल दक्षता बाळगावी, असे संस्थेच्या परिपत्रकात म्हटले आहे.
मात्र, मुस्लिम एज्युकेशन सोसायटीला या निर्णयामुळे कट्टरतावादी धार्मिक संघटनांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो.
काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर तेथील सरकारने बुरख्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे भारतासह जगभरात पडसाद उमटले होते. महाराष्ट्रात शिवसेनेकडून बुरखाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. मात्र, भाजपने अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही.