केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्यावर हल्ला
केरळमध्ये पून्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. रविवारी कुन्नूर येथे ही घटना घडली आहे.
नवी दिल्ली : केरळमध्ये पून्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. रविवारी कुन्नूर येथे ही घटना घडली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या आरएसएस कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, CPI (M) च्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आङे. आरएसएस कार्यकर्ता निधेश (28 वर्ष) याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचाराकरीता कोझीकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधेश याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, सत्ताधारी CPI (M)च्या कार्यकर्त्यांनी निधेशवर हल्ला केला आहे.
मुज्जफिललंगड समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळी 5.30 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यानंतर परिसरात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. कन्नूर परिसरात नेहमीच CPI (M) आणि भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होत असतात.
केरळमध्ये भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद-विवाद होत असतात. याविरोधात भाजपने जन रक्षा यात्राही काढली आहे. या यात्रेत भाजप अध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ, स्मृती ईरानी यांच्यासारखे दिग्गज नेते सहभागी झाले होते. भाजपच्या अनेक नेत्यांनी या हल्ल्यांनंतर राज्य सरकारवर थेट आरोप केले आहेत.
केरळमध्ये डाव्यांचं सरकार आहे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच भाजपचा एक आमदार निवडून आला आहे. केरळमधून डाव्यांना बाहेर काढू असे भाजपने अनेकदा दावे केले आहेत मात्र, अद्याप त्यांना यश आलेलं नाहीये.