कपाळावर गंध लावल्याने विद्यार्थिनीला मदरशातून काढले
मदरशातील एका लघुपटात ही विद्यार्थी अभिनय करणार होती.
थिरुवनंतपुरम: केरळमधील एका मदरशात कपाळावर गंध लावून आल्यामुळे एका विद्यार्थिनीची हकालपट्टी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही मुलगी पाचवीत शिकत होती. मदरशातील एका लघुपटात ही विद्यार्थी अभिनय करणार होती. त्यासाठी ती कपाळावर चंदनाचे गंध लावून गेली होती. मात्र, यामुळे तेथील शिक्षकांचा पारा चढला व त्यांनी तिला हाकलवून दिले. यानंतर या मुलीचे वडील उम्मर मलियल यांनी फेसबुक पोस्टवरून आपली व्यथा मांडली. यावरून आता दोन गट पडले असून ते परस्परांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
उम्मर मलियल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझी मुलगी अभ्यासात हुशार आहे. तिला नृत्य आणि अभिनयाचीही आवड आहे. तिने आतापर्यंत मदरसा स्तरावर झालेल्या स्पर्धेत अनेक बक्षिसं जिंकली आहेत. मात्र, इतकं असूनही तिला मदरशातून काढून टाकण्यात आले. त्यासाठी तिने कपाळावर गंध लावले होते, हे कारण न पटण्यासारखे असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर अनेकांनी मदरसा प्रशासनावर टीका केली. तर अनेकांनी मदरशाच्या निर्णयाचे समर्थन केले. डोक्यावर गंध किंवा टिकली लावणे शरीयत आणि इस्लामविरोधी आहे. अशा धार्मिक गोष्टींचे भान राखणे गरजेचे आहे, असे काहीजणांचे म्हणणे आहे. मात्र, एवढ्याशा कारणावरून मुलीच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.