मी तीन लाखांच्या मताधिक्याने जिंकलो नाहीतर समजून जा...
भाजपकडून जयाप्रदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
लखनऊ: रामपूर लोकसभा मतदारसंघातून माझा तीन लाखांच्या मताधिक्याने विजय झाला नाही तर यंदाची निवडणूक पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाली नाही, यावर शिक्कामोर्तब होईल, असे वक्तव्य समाजावादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार आणि अदलाबदली झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आझम खान यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण रामपूर मतदारसंघातून तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येऊ, असा दावा केला. तसे न घडल्यास ही निवडणूक पारदर्शीपणे पार न पडल्याचे सिद्ध होईल, असा दावा आझम खान यांनी केला.
आझम खान यांच्याविरोधात भाजपकडून जयाप्रदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मध्यंतरी प्रचारादरम्यान जयाप्रदा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आझम खान यांच्यावर दोनवेळा प्रचारबंदीही लादण्यात आली होती. जयाप्रदा या सपाच्या माजी खासदार राहिलेल्या आहेत. त्यांनी एप्रिल २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
विरोधी पक्षांकडून सातत्याने ईव्हीएम यंत्रात फेरफार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हा दावा सपशेल फेटाळला असून ईव्हीएम यंत्रे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. २३ मे रोजी निकाल जाहीर होण्यापूर्वी स्ट्रँग रुममधील ईव्हीएम यंत्रांवर लक्ष ठेवले जात आहे. याठिकाणी नियमांचे सक्त पालन होत असल्याचा दावाही निवडणूक आयोगाने केला.
तत्पूर्वी मंगळवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीदेखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्ट्राँग रुमबाहेर कडा पहारा देण्याचे आदेश दिले होते. एक्झिट पोल आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण निवडणुकीसाठी घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. काँग्रेस पक्ष नक्कीच चांगली कामगिरी करेल, असे प्रियंका यांनी म्हटले होते