न्यू इयर सेलिब्रेशनसाठी राहुल गांधी याठिकाणी
नुकतेच काँग्रेसचे अध्यक्ष झालेले राहुल गांधी नव्या वर्षाचं जंगी सेलिब्रेशन करणार आहेत.
पणजी : नुकतेच काँग्रेसचे अध्यक्ष झालेले राहुल गांधी नव्या वर्षाचं जंगी सेलिब्रेशन करणार आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राहुल गांधी गोव्याला पोहोचले आहेत. शनिवारी रात्री राहुल गांधी गोव्याला पोहोचले आहेत आणि काही दिवस ते तिकडेच राहणार असल्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेसच्या अधिकाऱ्यानं आयएएनएसला दिली आहे.
सोनिया गांधीही गोव्यातच
राहुल गांधी वैयक्तिक कारणांसाठी गोव्याला गेल्यामुळे ते कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला भेटणार नाहीत. राहुल यांच्या आई सोनिया गांधी या २७ डिसेंबरलाच गोव्याला गेल्या आहेत. सोनिया गांधींचा गोव्यात सायकल चालवतानाचा फोटो रितेश देशमुखनं शेअर केला होता.
अध्यक्ष झाल्यावर वाढल्या जबाबदाऱ्या
काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधी नव्या अवतारामध्ये पाहायला मिळत आहेत. हिमाचल प्रदेश निवडणुकीत जिंकून आलेले काँग्रेसचे आमदार आणि हरलेल्या उमेदवारांची राहुल गांधींनी बैठक घेतली. पराभवाच्या कारणांची माहिती राहुल गांधींनी या नेत्यांकडून घेतली.
या उमेदवारांची माहिती राहुल गांधींनी घेतली आणि २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मेहनत घ्यायला सांगितली. कितीही मोठा नेता असला तरी बेशिस्तपणा आणि पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. इमानदार आणि निष्ठावान कार्यकर्त्यालाच सन्मान मिळेल, असा इशारा राहुल गांधींनी दिला होता.