अयोध्या मध्यस्थ समिती : न्यायमूर्ती कलीफुल्ला यांच्याबद्दल जाणून घ्या...
न्या. कलीफुल्ला यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर नजर...
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी दिलेल्या महत्त्वाच्या निर्णयात रामजन्मभूमी वादग्रस्त जमिनीबाबत मध्यस्थीतूनच तोडगा काढण्याचे आदेश दिलेत. अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 'त्रिसदस्यीय समिती'ची नियुक्ती करण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीय. त्यात श्रीराम पंचू आणि श्री श्री रविशंकर यांचाही समितीत समावेश करण्यात आलाय.
सर्वोच्च न्यायालयानं सेवानिवृत्त न्यायाधीश एफ एम इब्राहिम कलीफुल्ला यांना राम जन्मभूमी - बाबरी मस्जिद प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या समितीचं अध्यक्ष का नेमलंय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल... या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला न्या. कलीफुल्ला यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर नजर टाकावी लागेल.
न्यायमूर्ती कलीफुल्ला यांची कारकीर्द
- न्यायमूर्ती कलीफुल्ला यांचा जन्म २३ जुलै १९५१ रोजी तमिळनाडूच्या शिवगंगई जिल्ह्यातील कराईकुडीमध्ये झाला
- त्यांचं पूर्ण नाव फकीर मोहम्मद इब्राहीम कलीफुल्ला असं आहे
- जस्टिस कलीफुल्ला २० ऑगस्ट १९७५ रोजी वकील म्हणून नामांकीत झाले. त्यानंतर त्यांनी टी एस गोपालन ऍन्ड कंपनी लॉ फर्ममध्ये श्रम कायद्याचा अभ्यास सुरू केला
- २ मार्च २००० मध्ये मद्रास हायकोर्टात त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली
- फेब्रुवारी २०११ मध्ये ते जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे सदस्य बनले. त्यानंतर दोन महिन्यांनी न्या. कलीफुल्ला यांना मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं
- सप्टेंबर २०११ मध्ये त्यांना जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं
- २ एप्रिल २०१२ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि मुख्य न्यायाधीश सरोश होमी कपाडिया यांनी त्यांना शपथ दिली
- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया (बीसीसीआय) पारदर्शी बनवण्याच्या प्रक्रियेत त्यांनी न्या. लोढा यांच्यासोबत काम केलं
- न्यायमूर्ती कलीफुल्ला २२ जुलै २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले