कधी विचार केलाय, कोणत्याही गोष्टीला चिकटवणारा गम, त्याच्या बाटलीला का चिकटत नाही?
बहुतेक लोक वापरतात तो पांढरा गोंद विविध रसायनांपासून तयार केला जातो. या रसायनांना पॉलिमर म्हणतात.
मुंबई : आपल्याला कोणतीही गोष्ट चिकटवाची किंवा जोडायची असेल तर आपण त्याच्यासाठी गम किंवा गोंदचा वापर करतो. वेगवेगळी वस्तु चिकटवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा गम वापरला जातो. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की वस्तु चिकटवणारं हे गम ज्या डब्बीत किंवा ट्यूब ठेवलं जातं, त्याला हा गम का चिकटत नाही? एवढंच काय तर सगळ्याच वस्तुंना चिकटवणारं सुपर गम फेव्हीक्वीक ज्या ट्यूबमधून येतं त्याला ते का चिकटत नाही? तर आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत, जे खूपच इंट्रेस्टींग आहे.
बहुतेक लोक वापरतात तो पांढरा गोंद विविध रसायनांपासून तयार केला जातो. या रसायनांना पॉलिमर म्हणतात. हे पॉलिमर लांब आणि चिकट पट्ट्या असतात. तुमच्यासाठी सर्वोत्तम गोंद तयार करण्यासाठी गोंद निर्माते अशा चिकट स्टँडचे योग्य प्रमाण वापरतात. हे पॉलिमर देखील लवचिक असतात, ज्यामध्ये पाणी मिसळलं जातं. ज्यामुळे हे एक प्रकारे विद्रावक म्हणून काम करतं.
त्यामुळे जोपर्यंत तुम्ही त्यावर काहीतरी चिकटवत नाही, तोपर्यंत हा गोंद द्रव स्वरूपात राहतो. त्यानंतर तो कठोर होतो.
गोंदच्या साहाय्याने एखादी गोष्ट कशी चिकटते?
जेव्हा तुम्ही कागदावर गोंद लावता तेव्हा त्यातील सॉल्व्हेंटचं (पाणी) हवेत बाष्पीभवन होते. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर हा गोंद सुकतो आणि कडक होतो. आता गोंदमध्ये फक्त चिकट आणि लवचिक पॉलिमर शिल्लक आहेत. अशा प्रकारे, गोंद च्या मदतीने, आपण काहीही चिकटवू शकता. विज्ञानात याला यांत्रिक आसंजन असेही म्हणतात.
मग आता हा प्रश्न येतो की, हा गोंद त्याच्या पॅकमध्ये का चिकटत नाही?
जेव्हा हा गोंद बाटली/पॅकमध्ये असतो, तेव्हा त्यात पुरेशी हवा नसते, ज्यामुळे यातील पाणी सुकत नाही. तुम्ही असेही म्हणू शकता की, याच्या पॅकिंगमुळे त्या गोंदमधील पाणी सुकत नाही किंवा कोरडे होत नाही. तुम्ही हे देखील लक्षात घेतले असेल की, जेव्हा तुम्ही काही काळ गोंदाचे झाकण बंद केले नाही तर ते कोरडे होऊ लागते. जास्त वेळ असेच उघडे ठेवले तर संपूर्ण गोंद सुकतो.
सुपर ग्लूने काय होते?
जेव्हा तुम्हाला काही गोष्ट पटकन चिकटवायची असेल, तेव्हा तुम्ही यासाठी सुपर ग्लू वापरु शकता. सुपरग्लू हे सायनोएक्रिलेट नावाच्या विशेष रसायनापासून बनवले जाते. जेव्हा हे रसायन हवेत असलेल्या पाण्याच्या कणांच्या संपर्कात येते तेव्हा एक प्रकारची रासायनिक प्रतिक्रिया होते. या प्रतिक्रियेमुळे, एक बंध तयार होतो. या प्रक्रियेला रासायनिक आसंजन म्हणतात.