गाडीवर तिरंगा लावून फिरणं बेकायदेशीर, काय आहेत झेंडा लावण्याचे नियम जाणून घ्या
गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे आणि राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आली आहे.
मुंबई : देशात प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू झाली आहे. या दिवसासाठी सर्वत्र सफेद कपडे, तिरंगा बाजारात उपलब्ध झाले आहेत. लोक हे झेंडे त्याच्या कपड्यांना लावतात तर काही लोक आपल्या गाडीला जसे की, बाईक किंवा कारला देखील लावतात. देशभक्तीच्या भावनेसाठी लोक असे करतात, पण तुम्हाला माहित आहे का की, ध्वज फडकवण्यासाठी अनेक कायदेशीर नियम आहेत आणि आपल्याला ते नियम माहित नसतात.
परंतु तुम्हाला माहित आहे का? या नियमात असे देखील म्हटले आहे की, प्रत्येकजण आपल्या कारवर किंवा गाडीवर भारताचा झेंडा लावू शकत नाही आणि असे करणे भारतीय ध्वज संहितेचे उल्लंघन आहे. आता असे म्हटल्यावर लोकांना हा प्रश्न पडला असेल की, असे कसे होऊ शकते? आम्ही तर खूप आधीपासून हे करत आलो आहेत. आम्ही कधी असं ऐकलं नाही.
आपण जरी असं करतं आलो असलो तरी, नियमानुसार हेच खरं आहे. माहितीच्या अभावामुळे आपण अशी चूक करतो.
भारतीय ध्वज संहितेनुसार, कारवर झेंडा लावण्याचे काय नियम आहेत. यामध्ये काही ठराविक लोकांना गाडीवरती झेंडा लावण्याचा अधिकार आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत की, नियमानुसार गाडीवर झेंडा कोण लावू शकतो.
झेंडा कोण लावू शकतो?
गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे आणि राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आली आहे. यामध्ये ध्वजारोहणाबाबत अनेक नियम करण्यात आले आहेत आणि राष्ट्रध्वजाचा वापर कसा करावा हे सांगण्यात आले आहे. या ध्वजसंहितेमध्ये काही लोकांना कारमध्ये (मोटार-कार) झेंडा लावण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि नायब राज्यपाल, पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री, मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या गाडीत झेंडा लावू शकतात.
झेंडा कसा लावायचा?
परदेशी पाहुणे जेव्हा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या कारमधून प्रवास करतात तेव्हा कारच्या उजव्या बाजूला राष्ट्रध्वज लावावा लागतो आणि संबंधित देशाच्या व्यक्तीचा ध्वज गाडीच्या डाव्या बाजूला लावावा लागतो.
नियमानुसार, वर नमूद केलेल्या व्यक्तीशिवाय अन्य कोणी गाडीवर झेंडा लावल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीने भारतीय राज्यघटने नुसार, झेंड्याचा कोणताही भाग जाळला, पायदळी तुडवला किंवा अपवित्र केला, तर राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. याशिवाय ध्वज संहितेत इतरही अनेक नियम निश्चित करण्यात आले आहेत, त्यानुसार ध्वजाचा वापर करता येईल.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश?
2004 पूर्वी केवळ सरकारी विभाग, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांवर झेंडे लावण्याची परवानगी होती. 2004 मध्ये, भारत सरकार विरुद्ध नवीन जिंदाल प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक भारतीयाला तिरंगा फडकवण्याचा अधिकार आहे. मात्र, गाडीवर तिरंगा लावण्याचा अधिकार फार कमी लोकांना मिळाला आहे आणि सामान्य माणूस तो झेंडा गाडीसमोर लावण्यासाठी वापरू शकत नाही.