राजस्थानच्या कोटामध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने घर सोडलं आहे. राजेंद्र मीना असं या विद्यार्थ्याचं नाव असून, गंगारामपूरचा निवासी आहे. घर सोडण्यापूर्वी त्याने आपल्या आई-वडिलांना एक मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये त्याने आपली पुढे शिकायची इच्छा नसल्याने जात असल्याचं सांगितलं आहे. तसंच आपल्याकडे 8 हजार रुपये असून वर्षातून एकदा फोन करेन असं आश्वासन दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, राजेंद्र मीनाचे वडील जगदीश मीना यांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. मुलाने मोबाईलवर मेसेज पाठवल्यानंतर त्यांना याबाबत माहिती मिळाली. 


मेसेजमध्ये राजेंद्रने लिहिलं आहे की, "मी घर सोडून जात आहे. माझी पुढे शिकण्याची इच्छा नाही. माझ्याकडे 8 हजार रुपये आहेत. मी 5 वर्षांसाठी जात आहे. मी माझा मोबाईल फोन विकणार असून, सीम कार्ड तोडून टाकेन. आईला माझी चिंता करण्यास सांगू नका. मी कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. माझ्याकडे सर्वांचे फोन नंबर आहेत. जर गरज लागली तर मी फोन करेन. मी वर्षातून एकदा नक्की फोन करेन".


राजेंद्रच्या वडिलांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, तो 6 मेपासून बेपत्ता आहे. त्याने कोटामधील घर दुपारी 1.30 वाजता सोडलं. तिथे तो पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. मेसेज मिळाल्यानंतर कुटुंबाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुण कुठेच सापडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. 


पोलिसांना राजेंद्र नेमका कुठे आहे याची काहीच माहिती मिळालेली नाही. पण त्यांनी शोध सुरु ठेवला असून, सर्च ऑपरेशन केलं जात आहे.  


दरम्यान या घटनेनंतर पुन्हा एकदा कोटामधील स्पर्धात्मक कोचिंग वातावरणात विद्यार्थ्यांवर येणारा ताण आणि दडपण समोर आलं आहे. विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण सोडण्याची ही पहिलीच घटना नाही. या अशा घटनांमुळे शैक्षणिक संस्था आणि पोलिस या दोघांकडूनही सतर्कता वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.