गौरी लंकेश हत्या प्रकरणी नवीनकुमारला ५ दिवसांची कोठडी
येथील ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश हत्याप्रकरणातील अटकेत असलेला आरोपी के. टी. नवीनकुमार याला न्यायालयाने ५ दिवसांची विशेष तपास पथकाची (एसआयटी) कोठडी सुनावली आहे.
बंगळुरु : येथील ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश हत्याप्रकरणातील अटकेत असलेला आरोपी के. टी. नवीनकुमार याला न्यायालयाने ५ दिवसांची विशेष तपास पथकाची (एसआयटी) कोठडी सुनावली आहे.
येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी अनेक दिवसांपासून गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात नवीनकुमार याच्या चौकशीसाठी कोठडीची मागणी करीत होती.
१८ फेब्रुवारी रोजी कर्नाटक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विंगच्या पथकाने के. टी. नवीनकुमार याला पिस्तुल विकताना रंगेहाथ अटक केली होती. दरम्यान, नवीनकुमार हा बंगळूरुतील 'हिंदू युवा सेना' या संघटनेचा अध्यक्ष असल्याची माहितीही पोलिसांच्या चौकशीदरम्यान समोर आली आहे. गौरी लंकेश यांची सप्टेंबर २०१७ मध्ये हत्या झाली होती. यानंतर ५ महिन्यांनी ही पहिली अटक करण्यात पोलिसांना यश आले.
कन्नड साप्ताहिक लंकेश पत्रिकाच्या गौरी लंकेश (५५) या संपादिका होत्या. १० सप्टेंबरच्या रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती.