प्रयागराज - ज्यांचा आदर्श आपण ठेवतो आणि त्यांच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करतो, असे प्रभू श्री राम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्या आयुष्यात कधीही धुम्रपान केले नाही. मग आपण का धुम्रपान करतो? कोणताही विलंब न करता आपण धुम्रपान सोडण्याचा निश्चय केला पाहिजे आणि तो अमलात आणला पाहिजे, असा सल्ला योगगुरू बाबा रामदेव यांनी कुंभमेळ्यासाठी प्रयागराजमध्ये जमलेल्या साधूसंतांना दिला. आयुष्यातील मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी, साधू होण्यासाठी आपण घरादाराचा त्याग केला. आपण आपल्या आई-वडिलांना सोडून निघून आलो मग आता धुम्रपान का सोडू शकत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा रामदेव यांनी यावेळी अनेक साधूंकडून त्यांच्या हातातील चिलम काढून घेऊन त्यांच्याकडून धुम्रपान सोडण्याचे आश्वासन घेतले. साधूंकडून काढून घेण्यात आलेल्या चिलम भविष्यात एका संग्रहालयात ठेवण्यात येतील. त्यासाठी संग्रहालयाची निर्मिती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जर मी देशातील तरुणांना धुम्रपान सोडण्यास सांगू शकतो, तर मग साधूसंताना का सांगू शकत नाही, असेही बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले.


काही दिवसांपूर्वी देशातील वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा मांडून बाबा रामदेव यांनी चिंता व्यक्त केली होती. ज्यांना दोनपेक्षा अधिक अपत्ये आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये. त्याचबरोबर त्यांना सरकारी नोकरीही नाकारली जावी, अशी मागणी त्यांनी केली होती. दोन पेक्षा अधिक अपत्ये असणारे कुटुंबीय कोणत्याही समुदायाचे असू दे त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या गेल्या नाही पाहिजेत. त्याशिवाय वाढती लोकसंख्या आटोक्यात येणार नाही, असे बाबा रामदेव यांनी म्हटले होते. ज्या लोकांनी लग्न केले नाही, त्यांचा विशेष सन्मान केला पाहिजे, अशीही मागणी बाबा रामदेव यांनी केली होती.