नवी दिल्ली: हिवाळ्याचा ऋतू सुरु होण्यास थोडाच अवधी शिल्लक असूनही अजूनही पूर्व लडाखमधील भारत आणि चीन यांच्यातील तणाव निवळलेला नाही. त्यामुळे आता भारतीय लष्कराने हिवाळ्यातही या भागात ठाण मांडून बसायची जोरदार तयारी सुरु केली आहे. भारताची ही तयारी पाहून चीनला काहीशी धास्ती वाटत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या LAC परिसरात भारतीय सैन्य मोठ्याप्रमाणावर तैनात आहे. त्यामुळे वेळ पडल्यास अगदी बर्फवृष्टीच्या काळातही भारतीय लष्कर अवघ्या काही तासांत चीनमध्ये शिरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी पिपल्स लिबरेशन आर्मीला PLA दिला आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला पूर्व लडाखच्या परिसरात भारत आणि चीनने प्रत्येकी ५० हजार सैनिक तैनात केले आहेत. याशिवाय, रणगाडे, तोफखान, वायूदल आणि इतर युद्धसामुग्रीही या भागात तैनात करण्यात आली आहे. 
तर दुसऱ्या बाजुला आता पाकिस्तान आणि चीन एकत्रपणे भारताविरुद्ध उभे ठाकण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरमधील स्कार्दू या हवाई तळावर चिनी विमान उतरले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलानेही वेळ पडल्यास चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर एकाचवेळी लढण्याची तयारी सुरु केली आहे. 

यादृष्टीने पाकव्याप्त काश्मीरनजीक असलेल्या भारतीय हवाई तळावर सुखोई ३० एमकेआय ही विमाने तैनात करण्यात आली होती. तसेच सीमारेषेवर असणाऱ्या प्रत्येक तळावर अन्नधान्य आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरळीत राहील, याची काळजी घेतली जात आहे. याशिवाय, चिनी सीमेपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या दौलत बेग ओल्डी येथेही भारताकडून लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि इतर सामुग्रीची जमवाजमव सुरु असल्याचे समजते.