कोरोना राहिला दूर; इथं दारु न मिळाल्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ
पाहा असं नेमकं का झालं...
तिरुवअनंतपूरम : कोरोना Coronavirus व्हायरसमुळे काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पंततप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची हाक देत कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांचं सहकार्य मागितलं. सावधगिरीचं पाऊल म्हणून अनेक राज्यांमध्ये याआधीच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाशी लढणारं असंच एक राज्य म्हणजे केरळ.
सध्याच्या घडीला केरळमध्येही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. पण, इथल्या प्रशासनासमोर एक वेगळीच अडचण उभी राहिली आहे. ही अडचण आहे मद्यपानाची उपलब्धता नसण्याची. लॉकडाऊनमुळे केरळमध्ये दारु, देशी दारुची दुकानंही बंद आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढा देतानाच इथे हा वेगळाच लढाही दिला जात आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, दारुचं व्यसन असणाऱ्या जवळपास पाचजणांनी केरळमध्ये लॉकडाऊनदरम्यान आत्महत्या केली आहे. व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयांमधील मानसिक आरोग्य केंद्रामध्ये शनिवारपासून एकाएकी गर्दी वाढू लागली. त्यातच शनिवारी दोघा मद्यप्रेमींनी आत्महत्या केल्याची बाबही समोर आली होती.
केरळमध्ये दारु विक्रीवरील निर्बंध नवे नाहीत. पण, दारुविक्री पूर्णपणे बंद होण्याची केरळमधील ही पहिलीच वेळ. त्यामुळे ही अडचणीची परिस्थिती केरळच्या प्रशासनासमोर सध्या उभी राहिली आहे.
आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांच्या माहितीनुसार बहुतांश सरकारी रुग्णालयं कोरोना रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कौटुंबीक आरोग्य केंद्रामध्ये मद्याच्या आहारी गेलेल्यांवर उपचार केले जाणार आहेत. जेथे मानसोपचार तज्ज्ञही सज्ज असणार आहेत. यातील अतिगंभीर रुग्णांना तालुका स्तरावरील रुग्णालयांत पाठवण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरही अशा रुग्णांची काळजी घेतली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील व्यसनमुक्ती मोहिमेच्या प्रमुखपदी असणाऱ्या डी. राजीव यांच्या माहितीनुसार मद्याच्या आहारी गेलेल्यांच्या समुपदेशनासाठी तीन विशेष केंद्र सुरु करण्यात आली आहेत. शनिवारी या ठिकाणी जवळपास शंभरहून अधिकांनी आपल्या तक्रारी आणल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये मानसिक तणाव असणाऱ्यांचं प्रमाण अधिक होतं, ज्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांचीही गरज होती. राजीव यांनी सांगितल्याप्रमाणे शासकीय यंत्रणेसोतबतच यामध्ये खासगी व्यसमुक्ती केंद्रांचीही इथे मदत घेतली जाणार आहे.
केरळच्या टेलिकाऊन्सिलिंग केंद्रातील समुपदेशकांच्या निरिक्षणानुसार, दैनंदिन पातळीवर मिळणारं मद्याचं प्रमाण न मिळत असल्यामुळे ही परिस्थिती उदभवताना दिसत आहे. ज्यामध्ये काहीदण आत्महत्येपर्यंत पोहोचले आहेत. शिवाय काहीजणांना इतरही शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामध्ये शरीर थरथरणं, घाम फुटणं आणि उष्माघाताचा शिकार होण्याचं सर्वाधिक प्रमाण दिसत आहे. यामध्ये कित्येकांना नैराश्यानेही ग्रासलं आहे. तेव्हा आता केरळ प्रशासन या परिस्थितीचाही सामवा कसं करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.