वाजपेयींना निरोप देताना लालकृष्ण अडवाणी भावूक
राजकारणाच्यानिमित्ताने दोघेही ६५ वर्ष एकमेकांसोबत होते.
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी दिल्लीत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. एम्स रुग्णालयातून गुरुवारी रात्री अटलजींचे पार्थिव कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात आणण्यात आले. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी वाजपेयींनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी वाजपेयींचे जुने सहकारी लालकृष्ण अडवाणी काहीसे भावूक झाले. कॅमेऱ्यांच्या नजरेपासून दूर ते एका बाजूला शांतपणे बसले होते. यावेळी अडवाणींचा दु:खी चेहरा बरेच काही सांगत होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक मित्र आणि महान व्यक्ती गमावल्याची वेदना स्पष्टपणे दिसत होती.
अटलबिहारी वाजपेयी अडवाणींपेक्षा वयाने मोठे होते. राजकारणाच्यानिमित्ताने दोघेही ६५ वर्ष एकमेकांसोबत होते. त्यामुळे दोघांमध्ये घनिष्ट मैत्री होती. अडवाणींचे कुटुंबीयही भाजप मुख्यालयात वाजपेयींचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळीही अडवाणी आणि त्यांच्या मुलीच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसले.