नवी दिल्ली: संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या 'चंद्रयान-२' मोहीमेचा महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी मध्यरात्री पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. 'चंद्रयान-२' या मोहीमेकडे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील ताकदीचे असामान्य उदाहरण म्हणून बघता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर विक्रम हे उपकरण उतरेल. हा टप्पा अत्यंत अवघड आणि महत्त्वाचा असेल. ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडल्यास भारत हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश ठरेल. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी तुम्ही स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करा. काही निवडक फोटो मी रिट्विट करेन, असे मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा खास सोहळा पाहण्यासाठी इस्रोमध्ये जाणार आहेत.




'इस्रो'कडून महत्त्वाकांक्षी 'गगनयान' मोहीमेची तयारी


एकीकडे चांद्रयान -२ मोहीम अखेरच्या टप्प्यात असतांना इस्रोची 'गगनयान' मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. या मोहिमेंतर्गत देशाचे अंतराळवीर इस्रो स्वबळावर अवकाशात पाठवणार आहे. २०२२ पर्यंत तीन भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी इस्रोची तयारी विविध पातळीवर सुरू आहे. यामध्ये अंतराळवीर निवडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भारतीय वायू दलाच्या टेस्ट पायलटची अंतराळवीर म्हणून प्राथमिक निवड करण्यात आली आहे. नुकत्याच या टेस्ट पायलटच्या प्राथमिक वैद्यकीय तपासण्या या इन्स्टिट्यूट ऑफ ऐरोस्पेस मेडिसिन या संस्थेने पूर्ण केल्या आहेत.