शेवटचा रविवार असल्याने कर्नाटकात प्रचारासाठी उतरले दिग्गज नेते
कर्नाटकात प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात
बंगळुरु : कर्नाटकमध्ये प्रचाराचा रणधुमाळीत आज शेवटचा रविवार असल्यानं सगळ्या पक्षांचे बडे नेते झाडून रस्त्यावर उतरलेत. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चित्रदूर्गमध्ये सभा घेतली. या सभेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेसमध्ये स्थानिक नेते निजलिंगप्पा यांची कशी गळचेपी झाली यावर मोदींनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसमध्ये एका विशिष्ठ घराण्याच्या भल्यासाठी इतर सगळ्या नेत्यांना बाजूला ठेवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तिकडे बंगळूरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांना उत्तरं दिली. केंद्रातलं मोदी सरकार नागरिकांच्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळवल्याचा दावा सिद्धरामय्यांनी केला.
कर्नाटकात मोदी आज रायचूर, जमखंडी आणि हुबळीतही सभा घेणार आहेत. अमित शहा देखील बेळगावमध्ये दोन सभा आणि दोन रोड शो कऱणार आहेत. अमित शहा सर्वात आधी बेळगावच्या तालुक स्टेडियममध्ये सभा घेतील. त्यानंतर ते सौदत्ती येल्लमा मंदिरात दर्शनासाठी जातील. त्यानंतर बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर बेळगावच्या उत्तर विधानसभा मतदारसंघात ते दुसरा रोड शो करतील. रामदुर्गमध्ये अमित शाहांची दुसरी सभा होणार आहे.