Leaders : IIM मध्ये प्रवेश न मिळाल्यानं थाटली चहाची टपरी; आज ‘तो’ करतोय कोट्यवधींची उलाढाल
शून्यातून सुरुवात केलेली उलाढाल आज कोट्यवधींवर
Leaders : असं म्हणतात की, तुम्ही जीवनात कोणत्याही गोष्टीचा निर्धार केला, तर अशक्य गोष्टीही अगदी सहज शक्य होतात. मध्य प्रदेशातील एका तरुणानं याचाच अनुभव प्रत्यक्ष घेतला आणि साऱ्या देशापुढं एक आदर्श प्रस्थापित केला. अनेक विद्यार्थ्यांप्रमाणेच मध्य प्रदेशातील प्रफुल्ल बिल्लौरे याचंही स्वप्न आयआयएममधून बिझनेस एँड एंटरप्रेन्योरशिपचं शिक्षण घेण्याचं होतं.
पण, प्रफुल्लनं धीर सोडला नाही. त्यानं चहाचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. आज तो एक यशस्वी व्यासायिक असून, त्याची उलाढाल कोट्यवधींमध्ये आहे. देशभरात तो, करोडपती चहावाला म्हणूनही ओळखला जातो.
CAT परीक्षेच्या तयारीपासून सुरु झाली गोष्ट संघर्षाची...
धार (Dhar) मधील लबरावदा या लहानशा गावातील प्रफुल्ल अहमदाबादमधून एमबीए करु इच्छित होता. यासाठी थेट अहमदाबादमध्ये जाऊन तिथं तयारी सुरु केली. सलग तीन वर्षे CAT साठी तयारी करुनही त्याला प्रवेश मिळूच शकला नाही.
अपयशाची ही ठेच मिळाल्यानंतर त्यानं मग स्वप्ननगरी मुंबईच्या दिशेनं मोर्चा वळवला. पण तिथंही अपयश आल्यामुळं तो अहमदाबादला परतला आणि इथे मॅकडॉनल्डमध्ये नोकरी सुरु केली. इथं त्याला प्रत्येक तासाचे 37 रुपये मिळत होते. दिवसातील 12 तास तो तिथे काम करत होता.
एक वेळ अशी आली, जेव्हा आपण नोकरीसाठी बनलोच नाही, याची जाणीव त्याला झाली. ज्यानंतर त्यानं व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. प्रफुल्लकडे यासाठीचे पैसे नव्हते. ज्यामुळं त्यानं वडिलांशी खोटं बोलून 10 हजार रुपये शिक्षणाच्या नावावर मागितले आणि एका महाविद्यालयाबाहेर त्यानं चहाचा स्टॉल लावला.
सुरुवातीला प्रफुल्लच्या दुकानावर कोणीही येत नव्हतं. ज्यानंतर त्यानं स्वत: चहा घेऊन लोकांपर्यंत जाण्यास सुरुवात केली. इंग्रजीत त्यानं चहाची मार्केटींग गेली. हळूहळू इंग्रजी बोलणारा चहावाला म्हणून त्याच्या स्टॉलवर गर्दी करण्यास सुरुवात केली. प्रफुल्लनं त्याच्या चहाच्या स्टॉलचं नाव ‘मिस्टर बिल्लौरे अहमदाबाद चायवाला’ असं ठेवलं.
सुरुवातीच्या काही दिवसांनंतर प्रफुल्लला चहाचा स्टॉल हटवावा लागला. ज्यानंतर त्यानं भाड्यानं एक दुकान घेतलं, अथक परिश्रमांनी तो आज यशाच्या शिखरावर पोहोचला. आजच्या घडीला संपूर्ण देशात MBA चायवाला या नावानं त्याच्या 22 हून अधिक शाखा आहेत. इतकंच नव्हे, आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याची एक शाखा लवकरच सुरु होणार आहे.