मुंबई : नशीबाची खेळी कोणालाच कळलेली नाही. पण, नशीबावरच विसंबून न राहता आपल्या पद्धतीनं आयुष्याची खेळी खेळणंही काही प्रसंगी महत्त्वाचं असतं. अनेकदा ही खेळी उलटते, पण बऱ्याचदा ती फायद्याचीही ठरते. देशातील अशाच एका व्यक्तीमत्त्वासोबत हे सारं घडलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीच्या जीवनप्रवासानं प्रत्येकालाच अभिमान आणि हेवा वाटला. ही व्यक्ती म्हणजे धीरुभाई अंबानी. या नावाची नव्यानं ओळख करुन देण्याची गरज नाही. पण, एक काळ असा होता जेव्हा या नावाची वेगळी अशी ओळख नव्हती. सर्वसामान्यांच्याच गर्दीतील हा एक चेहरा होता. पेट्रोलपंपावर महिना 300 रुपये पगाराच्या वेतनावर ते काम करत होते. पण पुढे त्यांनी जीवनात असा टप्पा गाठला, की तब्बल 62 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे ते मालक झाले. 


28 डिसेंबर 1932 मध्ये धीरुभाईंचा जन्म गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड येथे झाला होता. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांचं सुरुवातीचं आयुष्य फराच खडतर होतं. आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षणही अर्ध्यावर सोडावं लागलं होतं. व्यवसाय क्षेत्रात जेव्हा त्यांनी पाऊल ठेवलं त्यावेळी त्यांच्याकडे बँक बॅलन्स किंवा वारसा म्हणून मिळालेली संपत्ती यापेकी काहीच नव्हतं. अवघ्या 17 व्या वर्षी ते रमणीकलाल या भावाकडे येमेन येथे गेले. 


तिथे त्यांना एका पेट्रोल पंपावर नोकरी मिळाली. धीरुभाई यांचं काम पाहून पुढे त्यांना त्या फिलिंग स्टेशनमध्ये मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. काही वर्षे तिथे नोकरी केल्यानंतर ते 1954 ला भारतात परतले. व्यवसायात रस असल्यामुळं ते या क्षेत्रातील घडामोडींवर नजर ठेवून होते. 


देशात पॉलिस्टरची मागणी जास्त आहे, तर परदेशात मसाल्यांचा खप जास्त आहे हे त्यांनी जाणलं. ज्यानंतर रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशनची सुरुवात त्यांनी केली. ज्या माध्यमातून भारतातील मसाले परदेशात विकत परदेशातील पॉलिस्टर भारतात आणण्यास सुरुवात करण्यात आली. आपल्या कामासाठी म्हणून त्यांनी मुंबईत 350 चौरस फुटांची खोली खरेदी केली. ज्यामध्ये एक मेस, तीन खुर्च्या आणि दोन सहकारी होते. पुढे त्यांनी अहमदाबादमध्ये एक कापड गिरणी सुरु केली. 



असं म्हटलं जातं की धीरुभाई अंबानी एका कंपनीत कामाला असताना तिथे कर्मचाऱ्यांना चहा 25 पैशांना मिळत होता. पण धीरूभाई मात्र तिथे चहा न पिता नजीक्या एका मोठ्या उपहारगृहात जात होते. जिथे चहा 1 रुपयाला होता. यामागचं कारण विचारण्यात आलं तेव्हा तिथे मोठमोठे व्यापारी येतात आणि व्यवसायाबाबत चर्चा करतात त्यासाठीच आपण त्या ठिकाणी जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 


धीरुभाई अंबानी यांनी मस्जिद बंदर येथील नरसिंहा स्ट्रीटवरील लहानशा कार्यालयातून रिलायंस कमर्शियल कॉर्पोरेशनची सुरुवात केली. पुढे व्यापारात त्यांना बराच फायदा होत गेला. यादरम्यान त्यांचं कुटुंब भुलेश्वरमधील जय हिंद एस्टेट नावाच्या एका लहानशा खोलीत वास्तव्यास होतं. धीरूभाई कायम म्हणायचे, 'जो कोणी म्हणतो की मी 12 ते 16 तास काम करतो, तो एकतर खोटारडा आहे किंवा तो काम करण्यात अतिशय संथ आहे.'


पार्टी करणं हे त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध होतं. ते दर संध्याकाळी कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करत होते. धीरुभाईंना जास्त प्रवासही पसंत नव्हता. परदेशी दौऱ्यांसाठी ते कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवायचे. व्यवसाय क्षेत्रात त्यांना धोका पत्करणं आवडत होतं. त्यांनी अनेकदा या उद्योग समूहाचं नाव बदललं होतं. रिलायंस कमर्शियल कॉरपोरेशन, रिलायंस टैक्सटाइल प्राइवेट लिमिटेड आणि रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड अशा तीन रुपांत हे नाव समोर आलं होतं. 


स्वप्न पाहणं आणि त्याचा पाठलाग करणं न सोडणं हेच धीरुभाईंनी त्यांच्या जीवनप्रवासातून सर्वांना शिकवलं. आजच्या क्षणाला व्यवसाय क्षेत्रासोबतच जगभरात त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं.