पोस्टरवर विंग कमांडर `अभिनंदन`च्या फोटोंचा वापर, भाजप नेत्यावर कारवाई
या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत विंग कमांडर अभिनंदन यांचाही फोटो होता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ च्या महत्त्वांची घोषणा करतानाच निवडणूक आयोगानं यंदा सोशल मीडियावरही करडी नजर राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता निवडणूक आयोगानं आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईलाही सुरुवात केलीय. प्रचारासाठी आपल्या पोस्टरवर भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो वापरणाऱ्या भाजपच्या एका आमदाराला निवडणूक आयोगानं फटकारलंय. भाजप आमदार ओम प्रकाश शर्मा यांना निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस धाडलंय. सोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरून हे फोटो हटवण्याचे आदेशही देण्यात आलेत.
ओम प्रकाश शर्मा यांनी १ मार्च रोजी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्टर शेअर केलं होतं. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत विंग कमांडर अभिनंदन यांचाही फोटो होता. 'झुक गया पाकिस्तान, लौट आया देश का वीर जवान' अशा ओळीही या पोस्टरवर लिहिण्यात आल्या होत्या. या पोस्टरवर स्वत:चाही फोटो लावण्यास ओम प्रकाश शर्मा विसरले नव्हते.
सी-विजिल (cVIGIL) ऍपवर तक्रार
विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो भाजपनं याआधीही प्रचारासाठी वापरल्याचं निदर्शनास आलं होतं. सी-विजिल (cVIGIL) ऍपवरून यासंदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार मिळाली होती. भारतीय निवडणूक आयोगानं लोकसभा निडवणुकीत आचारसंहितेचा भंग करणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी सी-विजिल ऍप लॉन्च केलंय. भारताचा कोणताही नागरिक या अॅपद्वारे कोणत्याही मतदार संघातील चुकीच्या गोष्टींची तक्रार याद्वारे करू शकतो. अॅपवर तक्रार मिळाल्यानंतर पुढच्या १०० मिनिटांच्या आत त्यावर कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
दिल्लीतून भाजपचे आमदार असलेल्या ओम प्रकाश शर्मा यांनी निवडणूक आयोगाकडून आपल्याला नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. परंतु, आपण हा फोटो निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या अगोदरच पोस्ट केल्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या पोस्टर्सवर किंवा प्रचारा दरम्यान सेनेचा किंवा कोणत्याही सेनेच्या अधिकाऱ्यांचा फोटो वापरण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातलीय.