ट्विटरची टिव-टिव बंद, भारत सरकारचा जोर का झटका
आयटीच्या नियमांचं पालन न करणं माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरला चांगलंच महागात पडलं आहे.
मुंबई: नव्या आयटीच्या नियमांचं पालन न करणं माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरला चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे आता ट्विटरला कायदेशीर कारवाईलाही सामना करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरचं कायदेशीर संरक्षण संपलं आहे. आणि यानंतर आता ट्विटरला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
ट्विटरकडून 25 मे रोजी लागू झालेल्या नवीन आयटी नियमांचं आतापर्यंत पालन केलं गेलं नाही आणि याबाबत सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आता ट्विटरवर आयपीसी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला जाऊ शकतो आणि यासंदर्भात अधिक पोलीस चौकशीही होऊ शकते.
आयटी कायद्याच्या कलम 79 अंतर्गत ट्विटरला कायदेशीर संरक्षण मिळालं होतं. यामध्ये कायद्याने ट्विटरला कोणतीही कायदेशीर कारवाई, मानहानि तसंच दंडापासून सूट दिली होती.
यूपी पोलिसांनी ट्विटरसह 9 वर गुन्हा केला दाखल
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील लोनी येथे वृद्ध व्यक्तीला केलेल्या मारहाणीला जातीय रंग दिल्याबद्दल पोलिसांनी ट्विटर आणि इतर 8 जणांविरूद्ध एफआयआर नोंदवला आहे. या सर्वांवर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये काही तरुण व्यक्तीला मारहाण करताना दिसत होते. या व्हिडीओबद्दल दावा केला जात होता की या वृद्ध व्यक्तीला मुस्लिम असल्यामुळे मारहाण केली जाते. परंतु तपासणीनंतर पोलिसांना असं आढळलं की, हे दोन कुटुंबातील परस्पर शत्रुत्वाचं प्रकरण आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर व्हायरल करून जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.