Leopard India Pakistan Border Video: भारत आणि पाकिस्तानदरम्यानची आंतरराष्ट्रीय सीमा ही जगातील सर्वाधिक सैन्य तैनात असणाऱ्या सिमांपैकी आहे. अनेकदा या सीमेवरुन दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र पंजाब, राजस्थान, गुजरात आणि जम्मू-काश्मीरच्या सीमा लागून असलेल्या या देशातून दहशतवादी भारतात येऊ नये म्हणून भारतीय लष्कर दिवसरात्र डोळ्यांमध्ये तेल घालून देशाचं संरक्षण करत असते. या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. अशाच एका सीसीटीव्हीमध्ये चक्क एक बिबट्या पाकिस्तानमधून भारतात आल्याचं दृष्य कैद झालं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हा व्हिडीओ सीमा सुरक्षा दलाच्या सौजन्याने शेअर केला आहे.


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर बिबट्याची हलचाल कैद झाली आहे. पाकिस्तानच्या हद्दीतून हा बिबट्या भारतीय भूभागामध्ये आला आहे. जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यामधील रामगड सबसेक्टरमधील सीमारेषेवरुन बिबट्याने भारतात प्रवेश केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफने) येथील स्थानिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. स्थानिक प्रशासनानेही नागरिकांनी सतर्क राहण्यास सांगितलं आहे. 


4 लाख व्ह्यूज


"एका बिबट्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानमधून भारतीय सीमा भागातील सांबा जिल्ह्याच्या रामगड सबसेक्टरमध्ये प्रवेश केला आहे," अशा माहितीसहीत एएनआयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं बीएसएफचं म्हणणं आहे. पोलिसांनी स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलिसांनीही खबरदारीचा उपाय म्हणून मानवी वस्तीत गस्त वाढवल्याचं समजतं. एएनआयने शेअर केलेल्या व्हिडीओला 350 हून अधिक व्ह्यूज आहेत. तर जवळपास 4 लाखांपर्यंत व्ह्यूज या व्हिडीओला आहेत. 



अशा घुसखोरीचं स्वागत


हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने अशाप्रकारची घुसखोरी भारताला मान्य आहे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर अन्य एकाने प्रसिद्ध हिंदी चित्रपटामधील 'पंछी नदिया पवन के झोंके कोई सरहद ना इन्हें रोके' या गाण्याच्या ओळी शेअर करत या बिबट्याला कोणी थांबवण्याची हिंमत करु शकत नाही असं म्हटलं आहे.