नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखचे उपराज्यपाल राधा कृष्णा सोमवारी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी गृह राज्यमंत्री जी कृष्ण रेड्डी यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली, हे अद्याप कळू शकले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या तणावाबाबत चर्चा झाली असल्याचे बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांना भारतीय जवानांनी पूर्व लडाखच्या पँगोंग लेक भागात रोखले. चीनी आणि भारतीय सैन्य यांच्यात झडप झाली. यानंतर चुशुल येथे ब्रिगेड कमांडर स्तरावर बैठक सुरू आहे.


संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी आणि रविवारी रात्रीची आहे. आता पूर्व लडाखमधील विवादित सीमाप्रश्न सोडविण्यासाठी चीन आणि भारत राजनैतिक आणि लष्करी चर्चा करीत आहेत. सैन्याच्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट 2020 च्या रात्री, पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) पूर्वेकडील लडाखमधील पूर्वीच्या सहमतीचे उल्लंघन केले आणि स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.


सैन्याने सांगितले की, 'भारतीय सैन्याने पँगोंग तलावाजवळ चिनी सैनिकांच्या घुसखोरीला रोखले. याशिवाय आपली स्थिती मजबूत करण्यासाठी आणि चिनी हेतू रोखण्यासाठीही उपाययोजना केल्या गेल्या. भारतीय लष्कराने म्हटले की, चर्चेच्या माध्यमातून शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहेत, परंतु आपल्या क्षेत्रीय अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ते तितकेच तयार आहेत.'