नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या जवानांचं कौतुक केलंय. 'सध्या देशाच्या भावना एका वेगळ्या पातळीवर आहेत. देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपलिकडे आपला पराक्रम दाखवत आहेत. संपूर्ण देश एक आहे आणि आपल्या जवानांसोबत उभा आहे. संपूर्ण जग आपली इच्छाशक्ती पाहत आहे', असं त्यांनी म्हटलंय.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या महासंवाद कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेवर भाष्य केलं. सामर्थ्याचा संकल्प घेऊन आपले जवान सीमेवर उभे आहेत. आपण सगळेच भारताचे नागरिक आहोत. आपल्या सगळ्यांनाच देशाच्या समृद्धीसाठी आणि शांततेसाठी दिवस-रात्र एक करावा लागेल. हीच आपली पहिली जबाबदारी आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. आम्ही देशाच्या प्रत्येक वीर मुलगी आणि वीर जवानाच्या कुटुंबाच्या प्रति कृतज्ञ आहोत. राष्ट्र निर्माणासाठी जे कुणी कार्यरत असतील त्यांनी ते सुरू ठेवावं, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.


दरम्यान, जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्याचे पुरावे बुधवारी भारताकडून पाकिस्तानकडे सोपवण्यात आलेत. या पुराव्यांमध्ये हल्ल्यासंदर्भातील काही विशेष माहिती असून, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघनेचा पुलवामा हल्ल्यात हात होता, हे दर्शवणारे पुरावे असल्याचंही सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त या डोजियरमध्ये जैश ए मोहम्मदचं तळ आणि प्रशिक्षण केंद्र पाकिस्तानात असण्याची माहितीही देण्यात आली आहे. 


दुसरीकडे, पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना सुखरुप भारतात परत आणण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. भारत-पाक या शेजारील देशांत तणाव निवळल्यानंतर पाकिस्तानकडून या वैमानिकाला भारताच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं, अशी शक्यता कूटनीतिज्ञांकडून व्यक्त करण्यात आलीय.