नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वाजपेयी हे 93 वर्षांचे होते. ११ जूनपासून अटल बिहारी वाजपेयी एम्स रुग्णालयात होते. पण मागच्या ४८ तासांपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. प्रकृती खालावल्यामुळे बुधवारपासून त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले होते. अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशिया नावाच्या आजाराने ग्रासले होते. २००९ पासून ते व्हिलचेअरवर होते. ११ जूनला किडनीच्या संसर्गामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली.


अटलजींच्या निधनानंतर लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. माझं दु:ख व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. अटल बिहारी वाजपेयी माझे वरिष्ठ सहकारी होते. पण गेल्या ६५ वर्षांपासून आम्ही जवळचे मित्र होतो. आज मी माझा जवळचा मित्र गमावला, असं आडवाणी म्हणाले.