बिहारमध्ये पत्रकारावर गोळीबार, पत्रकाराची प्रकृती गंभीर
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची अज्ञातांनी हत्या केल्याच्या घटनेला काही तासच झाले असताना आता आणखीन एक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका वृत्तपत्राच्या पत्रकारावर गोळीबार करण्यात आला आहे.
पाटणा : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची अज्ञातांनी हत्या केल्याच्या घटनेला काही तासच झाले असताना आता आणखीन एक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका वृत्तपत्राच्या पत्रकारावर गोळीबार करण्यात आला आहे.
बिहारमधील अरवल जिल्ह्यात गुरुवारी एका हिंदी वृत्तपत्राच्या पत्रकारावर बाईकस्वारांनी गोळीबार केला. या हल्ल्यात पत्रकार पंकज मिश्रा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज मिश्रा हे गावातील बँकेतून एक लाख रुपये काढून आपल्या घरी परतत होते. त्याच दरम्यान बाईकस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या मिश्रा यांच्याकडून बाईकस्वारांनी पैसे आणि लॅपटॉप घेऊन तेथून पळ काढला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. तर, आणखीन एकाचा शोध सुरु आहे. वैयक्तिक द्वेषातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.