मुंबई : देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले आहे. कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातली कार्यालये , कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच देशातील अनेक जिल्ह्यात रेड, ऑरेज आणि ग्रीन झोन जारी केले आहेत. जे जिल्हे धोक्याच्या स्थितीत आहेत. तेथे लॉकडाऊन-२ लागू असणार आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात उद्योगधंदे, आस्थापना कार्यालये आणि कारखाने सुरु करण्याची परवागी मिळणार आहे. त्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम असणार आहेत. त्याचे पालन करणे हे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे, वैद्यकीय विमाही बंधनकारक असेल.


प्रत्येक व्यक्तीचं थर्मल स्क्रिनिंग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यालये सुरु करण्यापूर्वी या सर्व इमारतींचं प्रवेशद्वार , भोजनालय, लिफ्ट आणि प्रसाधनगृह पूर्णपणे निर्जंतुक करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्या-जाण्यासाठी वाहन उपलब्ध करणे आवश्यक असून, वाहनाच्या एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ ३० ते ४० टक्के इतकेच कर्मचारी एका वेळी वाहनातून प्रवास करु शकतील. कार्यालयाच्या परिसरात प्रवेश करणारे प्रत्येक वाहन फवारा मारुन निर्जंतुक करणे तसेच प्रवेश द्वारातून आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं थर्मल स्क्रिनिंग करणं बंधनकारक करण्यात आले आहे. 


मास्क वापरणे अनिवार्य


तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय विमा आवश्यक असून, हात धुण्यासाठी आणि सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करावी लागेल. प्रत्येक कार्यालयात कामाच्या दोन पाळ्यांमध्ये एक तासाचे अंतर ठेवणं,  सुरक्षित सामाजिक अंतराचं पालन व्हावे यासाठी जेवणाची सुट्टी वेगवेगळ्या वेळी देणे, तसेच कार्यालयाच्या परिसरात कुठल्याही कामाव्यतिरिक्त येणाऱ्यांना बंदी घालण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.  याशिवाय मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आलं असून थुंकण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापर अनिवार्य आहे. 


ग्रीन जिल्ह्यात उद्योगधंदे सुरु करणार! 


कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातले १७० जिल्हे हॉटस्पॉट म्हणून केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. मोठ्या संख्येने असलेले कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण असलेले किंवा कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या वाढण्याचा मोठा दर असलेले किंवा रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा दर जलद असलेल्या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटमध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 


ज्याठिकाणी कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण सापडले आहेत, अशा २०७ जिल्ह्यांचे वर्गीकरण नॉन हॉटस्पॉट असलेले जिल्हे म्हणून करण्यात आले आहे. याठिकाणी कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  ज्या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही अशा जिल्ह्यांचे वर्गीकरण हरित क्षेत्रात करण्यात आले आहे. तसेच ग्रीन सिग्नल असलेल्या जिल्ह्यात कार्यालये , कारखाने आणि आस्थापना आणि उद्योगधंदे अंशत: सुरु करण्याचा निर्णय करण्यात आला आहे.