जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठे यश
जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.
श्रीनगर : देशातील सध्या लॉकडाऊन (Lockdown) आहे. याच दरम्यान जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी जोरदार चकमक सुरु होती. भारतीय सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. श्रीनगरच्या कानीमजार नावाकदाल भागात ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठा हत्यारे आणि शस्त्र साठा जप्त केला आहे. जम्मू कश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांनी ही जोरदार कारवाई केली.
श्रीनगरमधील नावाकदल परिसरात सोमवारी रात्री सुरक्षा दल, काश्मीर पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली होती. या चकमकीत एक पोलीस जवान जखमी झाला आहे. सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशनवेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या चकमकीला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या चकमकीमुळे संपूर्ण राज्यातील इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या कारवाईच्यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी प्रथम सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणे सुरू केले. हे दोन्ही दहशतवादी निवासी भागात लपले होते. यानंतर सुरक्षा दलाने सर्व बाजूंनी परिसर घेरला आणि त्या परिसरातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केली. यानंतर आता सैन्याने दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील नवाकदल परिसरातील दाट लोकवस्तीत सोमवारी मध्यरात्री शोधमोहीम सुरु केली होती. यावेळी झालेल्या चकमकीनंतर संपूर्ण राज्यातील इंटरनेटसेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान, १७ मे रोजी जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये भारतीय सैन्य दलाचा एक जवान शहीद झाला होता