नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण वाहतूकही बंद आहे. त्यामुळे हाताला काम नसल्याने देशातील विविध भागांतून अनेक मजूर आपापल्या गावी जायाला निघालेत. मजूरांना गावी, घरी जाण्यासाठी वाहतूकीचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी थेट चालत जाण्याचा मार्ग निवडला आहे. घरी पोहचण्यासाठी कितीही अंतर असलं, तरी घरं गाठायचंय हाच एकमेव त्यांचा उद्देश आहे. अशातच मध्यप्रदेशमधील एक घटना समोर आली आहे. राजस्थामधील राहणारे भंवरलाल त्यांच्या फ्रॅक्चर झालेल्या पायाचं चक्क प्लॅस्टर काढून आपल्या घरी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मजूर असलेल्या भंवरलाल यांना मंदसौर जवळील चेकपोस्टजवळ अडवण्यात आलं. त्यांना राजस्थानात बारां जिल्हा येथील आपल्या गावी पोहचायचं आहे. त्यासाठी त्यांना आणखी 240 किलोमीटरचा प्रवास पायीच पूर्ण करायचायं. भंवरलाल रस्त्यावरच बसले आणि त्यांनी फ्रॅक्चर झालेल्या पायाचं प्लॅस्टर काढण्यास सुरुवात केली. भंवरलाल यांचा व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



भंवरलाल यांनी ते इथपर्यंत एका गाडीने आल्याचं सांगितलं. त्यांनी, 'मला माझ्या गावी जायचं असून माझ्या कुटुंबापर्यंत पोहचायचं आहे. मला या गोष्टीची माहिती आहे की पोलीस सीमांवर अडवत आहेत. पण माझ्याकडे दूसरा कोणताही पर्याय नाही. माझं कुटुंब एकटं आहे. माझ्याकडे काम नाही. त्यामुळे मी त्यांना पैसे पाठवू शकत नाही. मला 242 किलोमीटर दूर माझ्या गावी पोहचायचं आहे. कोणतंही वाहन उपलब्ध नसल्याने मला माझं प्लॅस्टर कापावं लागतंय. प्लॅस्टर कापल्यावर मी पुढचा प्रवास पायी करु शकेन.


कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण कंपन्या, कारखाने, फॅक्टरी बंद आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे, मजूरांचे मोठे हाल होत आहेत. हाताला काम नसल्याने, दररोज पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे घरभाडं कसं द्यायचं, खायचं काय असा प्रश्न त्यांना भेडसावतोय. त्यामुळे मजूरांनी आपला गावचा मार्ग धरला आहे. अनेक महामार्गांवर मजूरांचे लोंढेच्या-लोंढे आपापल्या गावी जाताना दिसतायेत. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंग्सिगचे तीन-तेरा वाजतायेत. त्यामुळे आता दिल्ली सरकारकडून मजूरांना कुठेही न जाण्याचं, तुमच्या राहण्या-खाण्याची सोय केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.