नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी राजकारण्यांबरोबरच खेळाडूही रिंगणात उतरत आहेत. क्रिकेटपटू गौतम गंभीर पाठोपाठ आता बॉक्सर विजेंदर सिंगही निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. विजेंदर सिंग याला काँग्रेसने दक्षिण दिल्लीमधून उमेदवारी दिली आहे. तर गौतम गंभीर हा भाजपच्या तिकीटावर पूर्व दिल्लीमधून निवडणूक लढवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर जाट आणि गुर्जर मतदार आहेत. तसंच हा मतदारसंघ हरियाणा राज्याच्या जवळच आहे. याचा फायदा करून घेण्यासाठी काँग्रेसने विजेंदर सिंग याला उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. दक्षिण दिल्लीमध्ये विजेंदर सिंग याचा सामना सध्याचे भाजप खासदार रमेश बिंधुरी यांच्याशी होणार आहे.



मागच्या निवडणुकीत काँग्रेसने दक्षिण दिल्ली मतदारसंघातून रमेश कुमार यांना उमेदवारी दिली होती. यावेळी मात्र रमेश कुमार यांच्याऐवजी विजेंदरला काँग्रेसने मैदानात उतरवलं आहे.


विजेंदरबरोबरच काँग्रेसने दिल्लीतल्या सगळ्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामुळे काँग्रेस आणि आपची दिल्लीमध्ये आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे.


दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत इशान्य दिल्लीमधून, अजय माकन नवी दिल्लीमधून, जेपी अग्रवाल चांदनी चौकमधून, अरविंदसिंग लवली पूर्व दिल्लीमधून, राजेश लिहोथिया उत्तर-पश्चिम दिल्लीमधून आणि महबाल मिश्रा यांना पश्चिम दिल्लीमधून उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे दिग्गज नेते कपिल सिब्बल यांना मात्र काँग्रेसने उमेदवारी दिली नाही.