नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं आज बैठक बोलावलीय. काँग्रेसनं यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केलीय. निवडणूक आयोगाला कारवाईचे निर्देश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी जवानांच्या आणि शहिदांच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.



सुष्मिता देव या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. सध्या आसामच्या सिलचर लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार आहेत. तसंच १७ व्या लोकसभेसाठी त्या याच मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणुकीला उभ्या आहेत.